PMC Action: बावधनमधील पाच आरएमसी प्लांटवर बुलडोझर! ३५ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
PMC Action: एचसीएमआरएल (HCMRL) प्रतिबंधित क्षेत्रातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५ आरएमसी प्लांट्सवर महापालिका, अतिक्रमण व महावितरणची संयुक्त कारवाई.

PMC Action- महापालिकेच्या बांधकाम विकास, अतिक्रमण आणि आकाशचिन्ह विभागाने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत बावधन बुद्रुक येथील पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मंगळवारी (दि. १३) कारवाई करण्यात आली. हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूट (HCMRL) प्रतिबंधित क्षेत्रातील नियमांची सर्रास पायमल्ली करणाऱ्या या प्लांटचे ३५ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आले.
प्रशासनाने सर्व ऑपरेटिंग रूम सील करीत महावितरणकडून या प्लांटचा वीजपुरवठाही कायमस्वरूपी खंडित केला आहे. या धडक कारवाईमुळे अनधिकृत व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. बावधन बुद्रुक येथील सर्व्हे नंबर २२१, २२३, २२४ आणि २२५ मधील द मार्क इन्फ्रा, केईसी इंटरनॅशनल लि., डीएनव्ही इन्फ्राकॉन एलएलपी, यशई इन्फ्रा आणि अल्ट्राटेक आरएमसी या पाच प्लांटवर महापालिकेने संयुक्त बडगा उगारला.
हे सर्व प्लांट एचसीएमआरएल (HCMRL) प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृतपणे सुरू होते. या कारवाईदरम्यान यशई इन्फ्राने न्यायालयात धाव घेत तात्पुरती स्थगिती मिळवली आहे. दरम्यान, येथील आरएमसी प्लांटमुळे होणारे धूळ-धुराचे प्रदूषण, नागरिकांचे बिघडणारे आरोग्य, जड वाहतुकीमुळे होणारी कोंडी आणि अपघातांमुळे स्थानिक रहिवाशी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे हे प्लांट हलविण्यासाठी जन आंदोलन उभारण्यात आले.
तर स्थानिक लोकप्रतिनिधी किरण दगडे पाटील आणि दिलीप वेडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत कारवाईची मागणी केली. अखेर या लढ्याला यश आले असून, महापालिकेने २ गॅस कटर, ६० महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान, १५ पोलीस आणि ४० बिगारी सेवकांच्या फौजफाट्यासह धडक मोहीम राबवून ही अनधिकृत बांधकामे पूर्णपणे भुईसपाट केली.
ही कारवाई महापालिका आयुक्त, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता प्रवीण शेंडे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर, परवाना विभागाचे उपायुक्त संदीप कदम आणि कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांनी घटनास्थळी उपस्थित राहून कारवाईचे नियंत्रण केले. तसेच, बांधकाम विकास विभागाचे उपअभियंता भास्कर हांडे व शाखा अभियंता अजय फाले यांनी या मोहीम यशस्वी केली.





