Modi Meets Medalists : “जो खेलेगा, वो खिलेगा!”; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील ३९ पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट
Modi Meets Medalists : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये पदक विजेत्या भारतीय खेळाडूंनी ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी पंतप्रधान निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

PM Narendra Modi Meets Commonwealth Games 2026 Medal Winners Athletes : स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे पार पडलेल्या ‘राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६’ (Commonwealth Games 2026) मध्ये भारतीय खेळाडूंनी तब्बल ३९ पदके जिंकून अभूतपूर्व कामगिरी केली आहे. या ऐतिहासिक यशानंतर रविवारी, ९ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या निवासस्थानी सर्व पदक विजेत्या खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन केले. या खास भेटीचा एक व्हिडीओ (Reel) पंतप्रधानांनी इन्स्टाग्रामवर शेअर करत “जो खेलेगा, वो खिलेगा!” असा संदेश देत खेळाडूंचे मनोबल वाढवले.
भारताची १३ सुवर्णपदकांसह पदकतालिकेत चौथी झेप!
या वेळच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय चमूने १३ सुवर्ण (Gold), १७ रौप्य (Silver) आणि ९ कांस्य (Bronze) पदकांची कमाई करत पदकतालिकेत चौथे स्थान पटकावले. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात महिला बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या साक्षी चौधरीने व्हिडीओ होस्ट करत सर्व खेळाडूंच्या वतीने पंतप्रधान मोदींचे आभार मानले. “आज पंतप्रधान सरांनी पदक विजेत्यांना बोलावले असून आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे,” असे साक्षीने या वेळी म्हटले.
बॉक्सिंगमध्ये सर्वाधिक १० पदकांची कमाई!
View this post on Instagram
भारतासाठी या स्पर्धेत बॉक्सिंग क्रीडा प्रकारात सर्वाधिक १० पदके (७ सुवर्ण आणि ३ रौप्य) मिळाली. याशिवाय ॲथलेटिक्समध्ये १० पदके जिंकण्यात यश आले, ज्यात गुलवीर सिंहने दोन वेगवेगळ्या प्रकारांत पदके जिंकली. वेटलिफ्टिंगमध्ये ८, पॅरा ॲथलेटिक्समध्ये ६, ज्युडोमध्ये ४ आणि पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये १ पदक भारताने आपल्या नावे केले. विशेष म्हणजे, राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात भारताने ज्युडोमध्ये पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावण्याचा ऐतिहासिक कारनामा केला.
या अभूतपूर्व यशानंतर आता भारतीय खेळाडूंचे पुढील लक्ष्य जपानमध्ये होणाऱ्या आगामी ‘आशियाई क्रीडा स्पर्धांमधील’ (Asian Games) चमकदार कामगिरीवर असणार आहे.





