टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसीय जपान दौऱ्यावर असून, त्यांनी पहिल्या दिवशी जपानच्या प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष नुकागा फुकुशिरो आणि जपानी खासदारांच्या एका गटासोबत बैठक घेतली. या बैठकीत भारत आणि जपान यांच्यातील दृढ आणि मैत्रीपूर्ण संबंधांवर सविस्तर चर्चा झाली. पंतप्रधानांनी या भेटीचे काही फोटो सोशल मीडिया ‘एक्स’वर शेअर केले. पंतप्रधानांनी ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये लिहिले, “स्पीकर नुकागा फुकुशिरो आणि जपानी खासदारांसोबत माझी एक उत्कृष्ट बैठक झाली. आम्ही भारत-जपानमधील मैत्रीपूर्ण नात्यांवर चर्चा केली. यावेळी संसदीय देवाणघेवाण, मानव संसाधन विकास, सांस्कृतिक आदान-प्रदान, अर्थव्यवस्था, आरोग्य, गतिशीलता भागीदारी, कृत्रिम बुद्धिमत्ता, विज्ञान आणि तंत्रज्ञान यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्यावर विशेष भर देण्यात आला.” पंतप्रधान मोदी शुक्रवारी सकाळी टोकियोत पोहोचले आणि त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गजांशी चर्चेने केली. भारत-जपान आर्थिक मंचात बोलताना त्यांनी जपानचे पंतप्रधान इशिबा यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी नमूद केले की, भारताच्या विकासयात्रेत जपान नेहमीच एक महत्त्वाचा भागीदार राहिला आहे. मेट्रोपासून उत्पादन, सेमीकंडक्टरपासून स्टार्ट-अप्सपर्यंत प्रत्येक क्षेत्रात आमची भागीदारी परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे. पंतप्रधानांनी जपानी उत्पादकांना भारतात येऊन काम करण्याचे निमंत्रण दिले. एका कार्यक्रमात ते म्हणाले, “मी सर्वांना आवाहन करतो, चला, ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या ध्येयाने पुढे जाऊया.” त्यांनी जपानी उत्पादकांना ‘सुझुकी’ आणि ‘डाइकिन’च्या यशोगाथा त्यांच्याही यशाच्या गाथा बनू शकतात, असे सांगितले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी तंत्रज्ञान आणि नवोन्मेषावर जोर देताना म्हटले की, जपान हा ‘टेक पॉवर हाऊस’ आहे, तर भारत ‘टॅलेंट पॉवर हाऊस’ आहे. ते पुढे म्हणाले, “भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, क्वांटम कम्प्युटिंग, बायोटेक्नॉलॉजी आणि अवकाश संशोधन यासारख्या क्षेत्रांत महत्त्वाकांक्षी पावले उचलली आहेत. जपानचे तंत्रज्ञान आणि भारताची प्रतिभा एकत्र येऊन या शतकातील तांत्रिक क्रांतीचे नेतृत्व करू शकतात.”