पंतप्रधान मोदी जाणार युक्रेनला; रशिया-युक्रेन संघर्षावर शांततामय मार्गाने तोडगा काढणार

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या २३ तारखेला युक्रेनच्या भेटीवर जाणार आहेत. त्या भेटीपूर्वी भारताने रशिया-युक्रेन युद्धावर शांततामय मार्गाने तोडगा काढला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या संघर्षावर शांततामय मार्गाने तोडगा काढला जाण्याचे आपले प्रयत्न सुरूच ठेवले जातील, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मोदी २३ ऑगस्ट रोजी युक्रेनची राजधानी किव्हला भेट देणार असून युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्स्की यांच्याशी ते चर्चा करणार आहेत.
युक्रेनमधील संघर्ष सोडवण्यासाठी भारत नेहमीच मुत्सद्देगिरी आणि संवादाचा आग्रह धरत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम क्षेत्र) तन्मय लाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष चर्चेचा एक भाग असेल, असे ते म्हणाले.
भारताचे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी स्वतंत्र संबंध आहेत, असे लाल यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. युक्रेनला भेट देण्यापूर्वी मोदी पोलंडला जाणार आहेत.





