पंतप्रधान मोदींची केरळमधील भूस्खलनग्रस्त वायनाडला भेट; सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन

वायनाड – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केरळमधील भूस्खलनग्रस्त वायनाडला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पुनर्वसनासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत उपलब्ध करण्याची ग्वाही दिली. मोदी सकाळच्या सुमारास केरळच्या कन्नूर विमानतळावर पोहचले. तिथून ते हेलिकॉप्टरने वायनाडला दाखल झाले. त्या प्रवासादरम्यान त्यांनी भूस्खलनग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. त्यानंतर त्यांनी भूस्लखनाचा तडाखा बसलेल्या काही भागांना प्रत्यक्ष भेट दिली.
भूस्खलनामुळे विस्थापित झालेल्यांना विविध मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यातील एका मदत छावणीला भेट देऊन मोदींनी भूस्खलनग्रस्तांची विचारपूस केली. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर मोदींनी उच्चस्तरीय बैठकीत वायनाडमधील स्थितीचा आणि पुनर्वसन आराखड्याचा आढावा घेतला. त्या बैठकीला केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनरयी विजयन, केंद्रीय मंत्री सुरेश गोपी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भूस्खलनात अनेकांनी सर्व काही गमावले. त्यांना मदत करण्यासाठी केरळ सरकारच्या बरोबरीने केंद्र सरकार उभे राहील, असे मोदींनी बैठकीत नमूद केले. भूस्खलनाने वायनाडमध्ये प्रचंड हानी झाली. २०० हून अधिक जणांना जीव गमवावा लागला. अजूनही सुमारे १३० जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते.




