पंतप्रधान मोदी आज मुंबईत; शहरातील वाहतुकीत केले महत्त्वाचे बदल…

मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराज्य प्रवास करणाऱ्या मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसला आज (10 फेब्रुवारी) हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. आणि त्यासाठीच शुक्रवारी म्हणजेच, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवतील.
सध्या उपलब्ध असलेल्या रेल्वे लाईनवरच वेगवान आणि आरामदायक प्रवासासाठी या रेल्वे बनविण्यात आल्या आहेत. संपूर्णपणे भारतीय बनावटीची ही पहिली सेमीस्पीड रेल्वे असेल. पूर्णपणे एसी, वायफाय, अद्ययावत सस्पेंशन, पूश बैक सीट्स अशी या रेल्वेची खासियत आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून मोदी मुंबईत पोहोचणार आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर विमानतळावरून ते थेट सीएसएमटीच्या दिशेनं रवाना होतील.
दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरातील काही मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. त्यामुळं मुंबईकरांची काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील एक पोस्ट देखील मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
दिनांक १०.०२.२३ रोजी नियोजित सार्वजनिक कार्यक्रमामुळे दु.२-४ कुलाबा, रीगल जंक्शन आणि पी डमेलो रोड ते छ.शि.म.ट. पर्यंतची वाहतूक आणि दु.४-६ एलिव्हेटेड रोड मार्गे अंतर राष्ट्रीय विमानतळ ते मरोळ होणारी वाहतूक संथ गतीने होण्याची शक्यता आहे.
नागरिकांना विनंती आहे त्यांनी नोंद घ्यावी.— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) February 9, 2023
कुलाबा, रिगल जंक्शन आणि पी डमेलो रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पर्यंतच्या वाहतुकीवर दुपारी 2 ते 4 या वेळेत काही प्रमाणात परिणाम होईल. त्याचबरोबर, देशांतर्गत विमानतळ ते मरोळपर्यंत उन्नत मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीत दुपारी 4 ते संध्याकाळी 6 या वेळेत किंचित बदल केला जाणार आहे.





