पंतप्रधान मोदींनी केली क्युबा, मलेशियाच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा

रिओ डी जानेरिओ (ब्राझील) – ब्रिक्स गटाच्या १७ व्या परिषदेनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्युबाचे अध्यक्ष मिगुएल डियाझ-कॅनेल बर्मुडेझ आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर बिन इब्राहिम यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधानांनी यापूर्वी २०२३ मध्ये जोहान्सबर्ग येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत क्युबाचे अध्यक्ष डियाझ-कॅनेल यांची भेट घेतली होती.
आज झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी आर्थिक सहकार्य, विकासातील भागीदारी , वित्तीय तंत्रज्ञान, क्षमता बांधणी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन तसेच आरोग्यसेवा या क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला.
डिजिटल क्षेत्रातील भारताच्या कौशल्याची दखल घेत, अध्यक्ष डियाझ-कॅनेल यांनी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि यूपीआयमध्ये रुची व्यक्त केली. क्युबाने आयुर्वेदाला उपचार पद्धती म्हणून मान्यता दिली आहे.
त्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली. क्युबाने भारतीय औषधकोशाला मान्यता देण्याचा प्रस्ताव पंतप्रधानांनी मांडला, त्यामुळे तेथे भारतीय जेनेरिक औषधांची उपलब्धताही होऊ शकणार आहे.
तर मलेशियाचे पंतप्रधान अन्वर बिन इब्राहिम यांच्याबरोबरच्या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, शिक्षण, आरोग्यसेवा, पर्यटन आणि लोकांमधील संपर्क या क्षेत्रांसह द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेतला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केल्याबद्दल पंतप्रधान इब्राहिम यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले. दोन्ही नेत्यांनी बहुपक्षीय क्षेत्र आणि प्रादेशिक सुरक्षा सहकार्यावरही चर्चा केली.
पंतप्रधानांनी आसियानच्या यशस्वी नेतृत्वासाठी मलेशियाचे अभिनंदन केले आणि आसियान-भारत मुक्त व्यापार कराराच्या पुनरावलोकनाच्या जलद आणि यशस्वी पूर्ततेसह आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारीला बळकटी देण्यासाठी मलेशियाच्या सहकार्याचे स्वागत केले.





