Canada : कॅनडामध्ये पंतप्रधान मोदींनी घेतल्या द्विपक्षीय बैठका ! अनेक नेत्यांशी केली चर्चा

Canada – जी-७ परिषदेच्या निमित्ताने कॅनडामध्ये गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध देशांच्या प्रमुख नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. परस्पर हिताच्या मुद्दयांबरोबर जागतिक पातळीवरील परिस्थिती आणि विकासासाठीच्या भागीदारीच्या मुद्दयावर त्यांनी चर्चा केली.
मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्याशी संवाद साधला. विविध मुद्द्यांबाबत विचारांचे आदानप्रदान करत, उभय नेत्यांनी भारत आणि फ्रान्स आपल्या वसुंधरेच्या भल्यासाठी एकत्रितपणे काम करत राहतील यावर भर दिला.
भारत आणि फ्रान्स आपल्या ग्रहाच्या भल्यासाठी एकत्रितपणे काम करत राहतील, असे मोदी यांनी एक्स वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
मोदींनी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याशी संवाद साधला. जी ७ शिखर परिषदेत दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याशी संवाद साधून आनंद झाला, असे मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
कोरिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष ली जे-म्युंग यांची देखील मोदींनी भेट घेतली. भारत आणि कोरियन प्रजासत्ताक वाणिज्य, गुंतवणूक, तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, जहाजबांधणी आणि इतर क्षेत्रात एकत्र काम करण्याचा प्रयत्नशील राहतील, असे पंतप्रधानांनी यावेळी जाहीर केले. अध्यक्ष ली जे-म्युंग आणि माझी कॅनडामध्ये समाधानकारक भेट झाली.
भारत आणि कोरियन प्रजासत्ताक वाणिज्य, गुंतवणूक, तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, जहाजबांधणी आणि इतर क्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असे पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अलिकडेच दक्षिण कोरियात झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ली जे म्युंग विजयी झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी म्युंग यांचे अभिनंदन केले.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशीही पंतप्रधान मोदी यांची चर्चा झाली. कॅनडामध्ये झालेल्या जी-७ शिखर परिषदेदरम्यान माझे मित्र, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांना भेटून आनंद झाला, असे आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. भारत आणि इटली यांच्यातील मैत्री अधिक दृढ होत राहील, आणि याचा मोठा लाभ आपल्या नागरिकांना मिळत राहील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधानांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. मेलोनी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टला त्यांनी प्रतिसाद दिला आहे. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, मी आपल्याशी पूर्णतः सहमत आहे. भारताची इटलीसोबतची मैत्री अधिक दृढ होत राहील,आणि याचा मोठा लाभ आपल्या नागरिकांना मिळत राहील, असे त्यांनी म्हटले आहे.





