PM Kisan Yojana: आर्थिक मदत की क्रूर थट्टा? पीएम किसान योजनेच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्याच्या खात्यात केवळ 1 पैसा जमा
PM Kisan Yojana: बँकिंग सिस्टीमचा तांत्रिक घोळ की अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा

PM Kisan Yojana: केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान सन्मान निधी योजना’द्वारे देशातील शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या या योजनेचा एक अजब प्रकार समोर आला आहे. एका शेतकऱ्याच्या खात्यात 2 हजार रुपयांऐवजी चक्क ‘एक पैसा’ जमा झाला आहे.
हा मेसेज पाहताच “ही सरकारची आर्थिक मदत आहे की क्रूर थट्टा?” असा संतप्त सवाल केला जात आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा या गावातील हा प्रकार उघडकीस आला आहे.
हप्त्याची प्रतीक्षा अन् मेसेज उघडताच…
केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना दोन-दोन हजारांचे तीन हप्ते दिले जातात. जेवनाळा येथील या पात्र शेतकऱ्यालाही आपल्या हप्त्याची प्रतीक्षा होती. याचदरम्यान त्यांच्या मोबाईलवर बँकेत पैसे जमा झाल्याचा एक मेसेज आला. हप्त्याचे पैसे आले म्हणून आनंदाने त्यांनी मेसेज उघडला, मात्र खात्यात २ हजार रुपयांऐवजी केवळ ०.०१ जमा झाल्याचे दिसत होते.
बँकिंग सिस्टीमचा तांत्रिक घोळ की अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा
या प्रकारानंतर परिसरात प्रशासकीय कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकीकडे कर्ज, बियाण्यांचा खर्च आणि पावसाची प्रतिक्षा ही संकटे असताना, शेतकऱ्याला केलेली ही मदत म्हणजे त्यांची थट्टा केल्यासारखेच आहे. PM Kisan Yojana
दरम्यान, हा बँकिंग सिस्टीमचा तांत्रिक घोळ आहे की अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु यावर आता कृषी विभाग आणि केंद्र सरकार काय स्पष्टीकरण देणार? संबंधित शेतकऱ्याला त्याचा हक्काचा हप्ता कधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. PM Kisan Yojana
हेही वाचा :






