PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ३० जूनपूर्वी ‘हे’ काम करा, नाहीतर पीएम किसानचा पुढील हप्ता अडकणार
PM Kisan Yojana: महा ई-सेवा केंद्रांवर बायोमेट्रिक पद्धतीने किंवा पीएम किसान मोबाईल ॲपवर फेस ऑथेंटिकेशनद्वारे घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा पर्याय आहे.

PM Kisan Yojana – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. योजनेचा पुढील हप्ता वेळेत मिळावा यासाठी सर्व लाभार्थ्यांनी ३० जून २०२६ पूर्वी ‘इ-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया अपूर्ण राहिल्यास पुढील हप्ता खात्यात जमा होणार नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. मावळ तालुक्यात पीएम किसान योजनेचे हजारो लाभार्थी आहेत.
केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जाते. मात्र अनेक ठिकाणी अपात्र लाभार्थी, चुकीची माहिती आणि तांत्रिक त्रुटी आढळून आल्याने सरकारने ‘इ-केवायसी’ अनिवार्य केली आहे. त्यामुळे आता प्रत्येक लाभार्थ्याची माहिती पडताळून पाहिली जात आहे.
कृषी विभागाने तालुकाभर जनजागृती मोहीम सुरू केली आहे. गावागावातील कृषी सहाय्यक, नोडल अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. तरीही अनेक लाभार्थ्यांनी अद्याप प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे अंतिम मुदतीपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह ‘इ-केवायसी’ पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पारदर्शकता आणि पात्र लाभार्थ्यांसाठी मोहीम
पीएम किसान योजनेचा लाभ केवळ पात्र शेतकऱ्यांनाच मिळावा, हा केंद्र सरकारचा उद्देश आहे. बनावट नोंदी, मृत लाभार्थी किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे लाभ घेणाऱ्यांना आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याची ओळख पडताळणी बंधनकारक करण्यात आली आहे.
‘इ-केवायसी’ करण्याचे पर्याय उपलब्ध
शेतकऱ्यांना प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जवळच्या महा ई-सेवा केंद्रात किंवा सीएससी केंद्रात जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने ‘ई-केवायसी’ करता येते. तसेच ‘पीएम किसान’ मोबाइल ॲपच्या माध्यमातून फेस ऑथेंटिकेशन वापरून घरबसल्या प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. याशिवाय गावातील कृषी सहाय्यक, नोडल अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडूनही आवश्यक मदत मिळू शकते.
तांत्रिक कारणांमुळे अनेकांचे हप्ते रखडले
मावळ तालुक्यात काही शेतकऱ्यांचे हप्ते आधीच तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित आहेत. बँक खात्याची माहिती, आधार क्रमांक आणि इतर तपशीलांमध्ये विसंगती असल्यामुळे लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. ‘इ-केवायसी’ पूर्ण झाल्यानंतर अशा त्रुटी दूर करण्यास मदत होणार आहे.
अंतिम मुदतीची वाट पाहू नका
३० जून ही अंतिम मुदत असल्याने शेवटच्या दिवसांमध्ये केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंतिम दिवसाची वाट न पाहता तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी, असे कृषी विभागाने म्हटले आहे.
कृषी विभागाचे आवाहन
“पीएम किसान योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवायचा असेल, तर प्रत्येक पात्र लाभार्थ्याने ‘ई-केवायसी’ पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रक्रिया न केल्यास पुढील हप्ता थांबू शकतो. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी वेळेत पडताळणी पूर्ण करावी,” असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया केवळ औपचारिकता नसून भविष्यातील आर्थिक मदतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.






