PM Kisan: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अपडेट; कधी मिळणार 21वा हप्ता जाणून घ्या…

PM Kisan 21 Installment: पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत देशभरातील 9.71 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लवकरच 2,000 रुपयांचा 21 वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. यंदा ऑगस्ट 2025 मध्ये 20 वा हप्ता जारी झाला असून, आता शेतकऱ्यांना पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांना दिवाळी (20 ऑक्टोबर 2025) आणि छठपूजेच्या आधी ही रक्कम मिळण्याची आशा आहे.
20 हप्त्यांद्वारे 4 लाख कोटींहून अधिक रक्कम वितरित –
फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झालेल्या पीएम किसान योजनेने सहा वर्षे पूर्ण केली आहेत. या योजनेच्या माध्यमातून जमीनधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये 6,000 रुपये थेट त्यांच्या आधार-लिंक्ड बँक खात्यात हस्तांतरित केले जातात. आतापर्यंत 20 हप्त्यांद्वारे देशभरातील शेतकऱ्यांना सुमारे 4 लाख कोटी रुपये वितरित झाले आहेत. गेल्या हप्त्यात, 2 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून 20 व्या हप्त्याअंतर्गत 9.71 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,500 कोटी रुपये हस्तांतरित केले.
21 व्या हप्त्याची शक्यता –
मागील सहा वर्षांच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट-नव्हेंबर कालावधीत पीएम किसान योजनेचे हप्ते जारी होतात. यंदा ऑगस्ट महिना उलटून गेला असला, तरी केंद्र सरकार 21 वा हप्ता वेळेवर जारी करेल, अशी अपेक्षा आहे. येत्या काही महिन्यांत बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, 30 सप्टेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होईल. त्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकार निवडणूक तारखांच्या घोषणेपूर्वी 21 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते.
कधी आणि किती रक्कम हस्तांतरित?
मागील आकडेवारीनुसार, ऑगस्ट-नव्हेंबर कालावधीत सहा पैकी दोनदा ऑगस्ट, दोनदा ऑक्टोबर आणि दोनदा नव्हेंबर महिन्यात हप्ते जारी झाले आहेत. उदाहरणार्थ:
2024: 18 वा हप्ता – 5 ऑक्टोबर (20,665.51 कोटी रुपये)
2023: 15 वा हप्ता – 15 नोव्हेंबर (19,596.74 कोटी रुपये)
2022: 12 वा हप्ता – 17 ऑक्टोबर (18,041.35 कोटी रुपये)
2021: 9 वा हप्ता – 9 ऑगस्ट (22,395.43 कोटी रुपये)
यंदा बिहार विधानसभा निवडणुका आणि दिवाळीचा सण लक्षात घेता, ऑक्टोबर 2025 मध्ये हप्ता जारी होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी सणासुदीची भेट
शेतकरी दिवाळी आणि छठपूर्वी 21 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. केंद्र सरकार यंदा निवडणूक आचारसंहितेपूर्वी ही रक्कम जमा करू शकते, जेणेकरून शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक दिलासा मिळेल. अधिक माहितीसाठी शेतकरी पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.





