PM Kisan 22nd Installment Date: पीएम किसानचा 22वा हप्ता लवकरच; अनेकांची नावे यादीतून वगळली
PM Kisan 22nd Installment Date:

PM Kisan 22nd Installment Date: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान) २२वा हप्ता कधीही जाहीर होण्याची शक्यता असून लाभार्थ्यांची पुनर्पडताळणी, ई-केवायसी आणि जमीन दस्तऐवजांची छाननी पूर्ण झाली आहे. मात्र या प्रक्रियेत अनेक शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत.
योजना काय आहे?
२०१८ मध्ये सुरू झालेल्या या केंद्र सरकारच्या शेतकरी कल्याण योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २,००० रुपये याप्रमाणे वर्षाकाठी ६,००० रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत २१ हप्ते वितरित झाले असून शेवटचा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आला होता.
नावे का वगळली?
योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या गरजूंपर्यंतच लाभ पोहोचावा यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर पुनर्पडताळणी मोहीम राबवली. यात दोन प्रमुख निकषांवर छाननी करण्यात आली. पहिला म्हणजे जमीन नोंदींची पडताळणी. १ फेब्रुवारी २०१९ नंतर जमीन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची माहिती विशेषत्वाने तपासण्यात आली.
दुसरा निकष म्हणजे एक कुटुंब, एक लाभार्थी नियम. पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले मिळून एक कुटुंब गणले जाते. ज्या कुटुंबात पती-पत्नी दोघेही हप्ते घेत असल्याचे आढळले, त्यांचे पेमेंट थांबवण्यात आले आहे.
लाभार्थी यादी कशी तपासाल?
pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकल्यास आपली माहिती तपासता येईल. माहितीत बदल करायचा असल्यास मुखपृष्ठावरील संबंधित पर्याय वापरावा.
हप्ता कधी मिळणार?
सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली तरी २२वा हप्ता या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात जारी होण्याची शक्यता आहे. वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होईल.





