नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधीच्या 21 व्या हप्त्याची रक्कम तीन राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पूरस्थितीतून सावरण्यासाठी वेळेआधीच पाठवण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. पीएम किसानच्या दोन हप्त्यांमध्ये चार महिन्यांचा कालावधी असतो. मात्र, पूरस्थितीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना 21 व्या हप्त्याची रक्कम जारी करण्यात आली आहे. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार तीन राज्यातील 27 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. या 27 लाख शेतकऱ्यांमध्ये 2.7 लाख महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. शिवराज सिंह चौहान म्हणाले, 21व्या हप्त्याची रक्कम पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरेल. तीन राज्यातील शेतकऱ्यांच्य खात्यात 21 व्या हप्त्याची रक्कम पाठवण्यात आली आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पूरस्थिती आणि जमीन खचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकट काळात त्यांना दिलासा देण्यासाठी पीएम किसान सन्मान निधीच्या 21 व्या हप्त्याची रक्कम देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे केंद्राकडे डोळे पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातदेखील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी शेतातील माती पुराच्या पाण्यामुळे खरडून गेली आहे. ज्या प्रमाणे केंद्राने पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यातील शेतकऱ्यांना मदत दिली. त्याप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील पीएम किसान सन्मान निधीच्या 21 व्या हप्त्याची रक्कम लवकर मिळावी, अशी राज्यातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.