‘वक्फ’च्या आडून पद्मनाभ मंदिराच्या सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

नाशिक : वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमिनी ताब्यात घेण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न असला, तरी या आडून पद्मनाभ मंदिरातील मोठ्या प्रमाणात असलेल्या सोन्यावर त्यांना डल्ला मारायचा आहे. ‘वक्फ’च्या आडून पद्मनाभ मंदिराच्या सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघातत्यासाठीच हा सर्व खेळ सुरू आहे, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी (६ एप्रिल) नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देशात महागाई प्रचंड वाढलेली आहे, मराठी शाळा बंद होत आहेत, रोजगार नाहीत पण केंद्र सरकारने एक खेळणे हाती दिले असून आपण हातावर हात ठेवून पहात बसलो आहोत ते म्हणजे वक्फ बोर्ड. इंग्रजांनी दिल्लीत राजधानी वसविण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी भू संपादन करताना प्रार्थना स्थळे सुरक्षित रहावित अशी मागणी झाली. त्यासाठी १९१३ साली पुनर्वसनासाठी बनवलेल्या कायद्यातून वक्फ बोर्ड बनले, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे सुरक्षित रहावित यासाठी ते बनवले होते. त्यात मंदिर, मशिद, गुरुद्वारा यांना विशेष अधिकार दिले होते. वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला तरी याच्याआडून पद्मनाभ मंदिरातील प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेल्या सोन्यावर त्यांना डल्ला मारायचा आहे आणि त्यासाठीच हा सर्व खेळ सुरु आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
संविधानाची प्रत घेऊन मंदिरात प्रवेश
राम नवमीनिमित्त कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतले. यादरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी संविधान हाती घेऊन काळाराम मंदिरात प्रवेश केला. यावेळी मंदिराचे महंत सुधीरदास तसंच काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत असलेले कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड देखील उपस्थित होते. देशात व राज्यात समतेचा, बंधुत्वाचा व संविधानाचा विचार नांदावा’, अशी प्रार्थना प्रभू श्रीरामाकडे केल्याचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.





