IPL 2027 : खेळाडूंची अदलाबदल! हार्दिक पंड्या पंजाबच्या संघात दाखल, अर्शदीप सिंग मुंबईत; इतक्या कोटींची झाली डील
IPL 2027 : अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आता पंजाब किंग्सकडून खेळताना दिसणार आहे, तर पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाला आहे.

IPL 2027 : आयपीएल २०२७ च्या आगामी हंगामापूर्वी एक मोठी घडामोड घडली आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात महत्त्वाच्या खेळाडूंची अदलाबदल झाली असून, या ट्रेडची अधिकृत घोषणा आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंटवरून करण्यात आली आहे.
अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आता पंजाब किंग्सकडून खेळताना दिसणार आहे, तर पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही संघांमधील ही ट्रेड डील १८ कोटी रुपयांमध्ये पूर्ण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या खेळाडूंच्या अदलाबदलीबाबत चर्चा सुरू होती. अखेर ११ नोव्हेंबर रोजी आयपीएलने अधिकृत पोस्ट शेअर करत या व्यवहाराला मान्यता दिल्याची माहिती जाहीर केली.
हार्दिक पंड्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधून झाली होती. मुंबईकडून खेळताना त्याने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले. त्यानंतर २०२२ मध्ये त्याने गुजरात टायटन्सकडून खेळण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, पहिल्याच हंगामात त्याने गुजरातला विजेतेपद मिळवून दिले. २०२४ मध्ये हार्दिक पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये परतला आणि त्याच्याकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
मात्र, हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला अपेक्षित यश मिळवता आले नाही. तसेच त्याला कर्णधार बनवण्याच्या निर्णयावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर हार्दिकला नेतृत्व देण्यात आले होते. त्यामुळे वानखेडे स्टेडियमवरही त्याला अनेकदा प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
हार्दिकच्या पंजाबमधील प्रवेशामुळे मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदाची धुरा सांभाळणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. त्याने अखेरचे २०२३ मध्ये संघाचे नेतृत्व केले होते. त्या हंगामात मुंबईला क्वालिफायर-२ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
दरम्यान, अर्शदीप सिंगच्या मुंबई इंडियन्समधील आगमनामुळे संघाच्या वेगवान गोलंदाजीला नवी ताकद मिळणार आहे. आगामी हंगामात हार्दिक पंजाबकडून कशी कामगिरी करतो आणि अर्शदीप मुंबईसाठी किती प्रभावी ठरतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Amritpal Singh : अमृतपाल सिंग यांना निवडणूक आयोगाचा झटका ; पक्ष नोंदणीचा अर्ज फेटाळला





