plastic virus : शेतकरी पुन्हा अडचणीत ! टोमॅटो शेती प्लॅस्टिक व्हायरसच्या विळख्यात

नाशिक – कांद्या पाठोपाठ जिल्ह्यातील टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. टोमॅटोला भाव मिळत नाही. त्यातच रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उभी पिके सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
स्थानिक बोली भाषेत शेतकऱ्यांनी “प्लॅस्टिक व्हायरस’ (plastic virus) असे रोगाला नाव दिले आहे. शेतकऱ्यांना धडकी भरविणारा हा प्लॅस्टिक व्हायरसमुळे शेतच्या-शेत वाया जात असल्याने शेतकऱ्यावर नवे संकट उभे ठाकले आहे.
नाशिक जिल्ह्यात कांद्याबरोबर मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. हळूहळू टोमॅटो पीक बाजारात येऊ लागले आहे. मात्र दुसरीकडे टोमॅटो पीक ऐन भरात असताना प्लॅस्टिक व्हायरसचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
निफाड तालुक्यातील वडाळी गावातील लक्ष्मण झालटे यांनी गेल्या दोन अडीच महिन्यापासून तळ हातावरील फोडा प्रमाणे टोमॅटो पिकवला.
मात्र 50 व्या दिवसापासूनच टोमॅटो पिवळा पडायला लागला आहे, टोमॅटो दाबला तरी तो दाबला जात नाही, एवढा कडक असून खेळण्यातील प्लस्टिकच्या टोमॅटोसारखा चमकत असल्याने शेतकऱ्यांनी त्याला “प्लस्टिक व्हायरस’ नाव दिले आहे.
काही शेतकरी वातावरणातील बदलामुळे रोग पडल्याचे सांगत आहेत तर काही, भेसळयुक्त बियाणे मिळाल्याने पीक खराब झाल्याचा दावा करत असून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
एकदोन शेतकरी नाही तर वडाळी आणि आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांनाही अशाच समस्येला सामोरे जावे लागत असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे.
कृषी विभागाच्या पथकाकडून पिकांची पाहणी !
शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाच्या पथकाने पिकांची पाहणी करत त्याचे पंचनामे केले असून 50/60 दिवस वाढलेली पीके खराब का होत आहेत, याचे शास्त्रीय कारण शोधले जात आहे.
बियाणे खराब, भेसळयुक्त असतील तर संबंधितावर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. एकीकडे भाव नाही म्हणून लाल चिखल होतोय,
तर दुसरीकडे झाडावरच टोमॅटो खराब होत असल्याने पीक सोडून देण्याची वेळ आली आहे. कृषी विभागाच्या पाहणीत काय बाहेर येते आणि शेतकऱ्यांना काय दिलासा मिळतो याकडे लक्ष लागले आहे.





