धुळ वाफेतील पेरलेल्या भात पीकाच्या लावणीला सुरुवात

हिरडस मावळ – भोर तालुक्यातील हिर्डोशी खोर्यात भात लावणीला सुरुवात करण्यात आली आहे. भोर तालुक्यातील हिरडस मावळ भागात भात हेच प्रमुख पीक आहे. या भागात पारंपारीक पध्दतीने भात पीकाची पेरणी धूळ वाफेत केली जाते. हिर्डोशी भागात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व जूनच्या पहिल्या आठवड्यात धूळ वाफेत भात पेरणी केली होती.
त्यानंतर पडलेल्या वळीव पावसात तरव्यांची उगवण चांगली झाली होती. परंतू रोपे उगवून आल्यानंतर पाऊसाला सुरुवात झाली नसल्याने रोपे वाळून जाण्याची भिती निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने गेल्या पाच-सहा दिवसांपासून मान्सूनचे आगमन होऊन दमदार पाऊस सुरु झाला आहे. पावसाची दमदार सुरुवात चालूच आसल्याने भात खाचरातून पाणी साचू लागले आहे.
पेरणी होऊन महिना झाला आहे. त्यामुळे भात रोपांची वाढ बर्यापैकी झाली आहे. ज्या रोपांची उगवण चांगली होऊन रोपे लागवडी योग्य झाली आहेत अशा रोपांची लागवड आता सुरु झाली आहे. हिर्डोशी गावातील शेतकरी भागुजी धामुनसे व मारुती धामुनसे यांनी भात लावणीला सुरुवात केली आहे.
आता पुढील पंधरा दिवस या भागातील शेतकर्यांची भात लावणीची लगबग राहणार आहे. पुढील पंधरा दिवसात भात लावणीची लगबग राहणार असल्याने मजूर तुटवडाही भासणार असल्याने लागवडी योग्य आलेल्या रोपांची लागवड केली जात आहे.




