Pimpri : देशी वृक्ष, फळझाडे लागवड ही काळाची गरज : शिंदे

वडगाव मावळ : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या १०व्या वर्धापनदिनानिमित्त आणि चार्टर्ड प्रेसिडेंट विलास काळोखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. या कार्यक्रमाअंतर्गत इंद्रायणी महाविद्यालय प्रांगणात १०० फणसाच्या झाडांची आणि आंबी येथील केअरिंग हँड्स कलाश्रम वस्तीगृहात ५० फणसाच्या झाडांची लागवड करण्यात आली. तसेच कलाश्रम संस्थेला एक महिन्याचे रेशन साहित्य प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात गणेशाची आरती करून झाली. अध्यक्षीय भाषणात रोटरी क्लबचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी देशी वृक्ष आणि फळझाडांची लागवड करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केले. त्यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांना प्राधान्य देण्याचे सांगितले.
रोटरी क्लबचे संस्थापक विलास काळोखे यांनी कलाश्रम संस्थेच्या कार्याची माहिती देताना, देशभरातील दुर्गम भागांतील गरजू विद्यार्थ्यांचे संगोपन संस्थेमार्फत विनामूल्य केले जाते, ही मोठी समाजसेवा आहे, असे सांगितले. रोटरी क्लबकडून या संस्थेला भविष्यात शैक्षणिक मदत देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलाश्रमचे सचिव अंबादास चव्हाण यांनी केले. या वेळी हरिश्चंद्र गडसिंग, सुरेश दाभाडे, संजय मेहता, सुरेश शेंडे, पुंडलिक देशमुख, संग्राम जगताप, गोपाळ नागरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुंडलिक देशमुख, दशरथ पुजारी, मोहन खांबेटे, नितीन शहा, संजय चव्हाण, राजेंद्र कडलक, निलेश राक्षे, तानाजी मराठे, संजय भागवत, सुनंदा वाघमारे, ॲड. वैशाली लगाडे, आनंद रिकामे, राजेश बारणे, विश्वास कदम, रघुनाथ कश्यप, विलास वाघमारे, नरेंद्र ननावरे, ॲड. लक्ष्मण घोजगे, ॲड. रामदास काजळे यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे आभार कलाश्रम संस्थेचे विश्वस्त नरेंद्र कसलेकर यांनी मानले.





