‘मंकी पॉक्सचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना करा’; पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई – राज्यात मंकी पॉक्स प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. मुंबईत याची लागण होऊ नये यासाठी राज्य सरकारने काही प्रतिबंधात्मक उपाय राबवावेत, अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र देखील लिहिले आहे.
मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर राज्यात उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. तब्बल 70 हून अधिक देशांत मंकी पॉक्स आजाराचा फैलाव झाल्याची माहिती मिळत आहे. या आजाराचा वेगाने होणारा प्रसार पाहून जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्य आणीबाणीही जाहीर केली आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, राज्यात मंकीपॉक्स व्हायरसच्या वाढत्या धोक्याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. अलीकडेच देशाने कोविड-19 व्हायरस सारख्या आजारासोबत लढण्याचे मोठ आव्हान लीलया पेलले आहे. लाखो कोविड योद्ध्यांच्या अथक आणि निस्वार्थ प्रयत्नांमुळे आपण त्या संकटावर मात केली.
मात्र, आता पुन्हा एकदा तशीच काहीशी परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे. सध्या जगात मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव वाढतो आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील अलीकडेच मंकीपॉक्स ला ‘सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ घोषित केले आहे.
आफ्रिकेत उगम झालेला हा व्हायरस आता वेगाने पसरत आहे. मंकीपॉक्स आता पाकिस्तानात पोहोचला आहे. ही आपल्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. आपल्या देशात त्याचा प्रवेश आणि प्रसार रोखण्यासाठी सरकारने सक्रिय पावले उचलावीत, अशी विनंती त्यांनी केली.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उच्च संसर्ग असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर चाचणी आणि विलगीकरण सुविधांची अंमलबजावणी केली जावी, अशी सूचना त्यांनी पत्रातून केली आहे.





