PKL 2025 Final : दबंग दिल्लीचा थरारक विजय! पुणेरी पलटनवर अवघ्या २ गुणांनी मात करत दुसऱ्यांदा पटकावले PKL चे जेतेपद

PKL Final 2025 Dabang Delhi Clinch PKL 2025 Title : प्रो कबड्डी लीग (पीकेएल) २०२५ च्या थरारक अंतिम सामन्यात दबंग दिल्लीने पुणेरी पलटन संघावर ३०-२८ अशा फरकाने अवघ्या दोन गुणांनी मात केली. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात दिल्लीने बलाढ्य पुणेरी पलटनला पराभूत करत दुसऱ्यांदा पीकेएलचे जेतेपद पटकावले. या विजयासह दिल्लीने जयपूर पिंक पँथरच्या बरोबरी साधली असून, दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन वेळा ट्रॉफी उंचावली आहे. तरीही, सर्वाधिक तीन वेळा विजेतेपद जिंकण्याचा विक्रम पटना पायरेट्सच्या नावावर कायम आहे.
फायनलमधील दिल्लीची दबंगिरी –
दबंग दिल्ली आणि पुणेरी पलटन यांच्यातील अंतिम सामना सुरुवातीपासून शेवटपर्यंत अॅक्शनने भरलेला ठरला. दोन्ही संघांनी डिफेन्स आणि रेडिंगमध्ये पूर्ण ताकद पणाला लावली. मात्र, दिल्लीने योग्य वेळी शानदार खेळ करत पुणेरी पलटनवर २ गुणांच्या फरकाने विजय मिळवला. सामन्याची अंतिम गुणफलक ३०-२८ असा राहिला. दिल्लीसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला, कारण वर्षानुवर्षांच्या प्रयत्नांनंतर त्यांनी पीकेएलची ट्रॉफी पुन्हा जिंकली. यापूर्वी त्यांनी सीझन ८ मध्ये विजेतेपद पटकावले होते आणि आता सीझन १२ मध्ये पुन्हा चॅम्पियन ठरले.
आशु मलिकचे शानदार नेतृत्व –
दिल्लीच्या विजयात कर्णधार आशु मलिकचे नेतृत्व आणि रेडिंगचा जलवा निर्णायक ठरला. आशुने संपूर्ण हंगामात महत्त्वाचे रेड पॉइंट्स मिळवले आणि कठीण प्रसंगी संघाला सावरले. फायनलमध्ये नीरज नरवालने सर्वाधिक ९ गुण संघासाठी कमावले. पुणेरी पलटनच्या डिफेन्सने चांगली लढत दिली, पण दिल्लीच्या आक्रमक रेडर्सना पूर्णपणे रोखता आले नाही. दिल्लीच्या डिफेन्सनेही फायनलमध्ये उत्कृष्ट समन्वय दाखवला. त्यांनी पलटनच्या रेडर्सना मॅटबाहेर करण्यासाठी यशस्वी टॅकल्स केले, ज्यामुळे संघाला निर्णायक आघाडी मिळाली.
हेही वाचा – IND vs PAK : भारत-पाक पुन्हा एकदा येणार आमने-सामने! ‘या’ दिवशी रंगणार ब्लॉकबस्टर सामना
पुणेरी पलटनचे दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले –
पुणेरी पलटनने संपूर्ण हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली आणि लीगमधील सर्वात मजबूत संघांपैकी एक ठरला. तरी फायनलमध्ये ते आपला सर्वोत्तम खेळ दाखवू शकले नाहीत. पराभव असला तरी पुणेरी पलटनचा हा हंगाम संस्मरणीय राहिला. त्यांनी सिद्ध केले की, भविष्यात पीकेएल जेतेपदासाठी ते प्रबळ दावेदार आहेत. पीकेएल २०२५ च्या या थरारक सांगतेने कबड्डीप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले असून, पुढील हंगामाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत!





