Piyush Goyal : पंतप्रधानांच्या लोकप्रियतेमुळे राहुल यांना धोका वाटतो; मंत्री पियुष गोयल यांचा दावा
राहूल गांधी स्वतःला युवा नेते मानत असत, परंतु आता तरुणांमध्ये त्यांना पूर्वीसारखा प्रतिसाद मिळत नाही, असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी म्हटले.

Piyush Goyal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तरुणांमधील वाढती लोकप्रियता पाहून लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना धोका वाटत आहे, कारण राहूल गांधी स्वतःला युवा नेते मानत असत, परंतु आता तरुणांमध्ये त्यांना पूर्वीसारखा प्रतिसाद मिळत नाही, असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी रविवारी म्हटले.
भाजपला युवा मतदारांचा पाठिंबा कायम असल्याचे सांगत, गोयल (Piyush Goyal) म्हणाले, जनरेशन झेड नेहमीच आमच्यासोबत राहिली आहे. भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मोदींच्या संकल्पनेला तरुणांचा पाठिंबा कायम राहील. त्यांनी मोदींचे वर्णन जगातील सर्वात लोकप्रिय नेते असे केले.
तरुणांशी असलेला त्यांचा संवाद व सोशल मीडियावरील त्यांची सक्रियता यामुळे देशाच्या विकासाला गती मिळेल. पंतप्रधान मोदी तरुणांशी जोडले जात आहेत. राहूल यांच्याकडे पंतप्रधान मोदींइतकी लोकप्रियता आता उरलेली नाही, हे सिद्ध झाले आहे.
नवी दिल्लीतील जंतरमंतरवर तरुणांनी केलेल्या आंदोलनाबाबत विचारले असता, गोयल यांनी पेपरफुटीच्या प्रकरणातील केंद्र सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले. मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने यासंदर्भात कठोर कायदा केल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने २०१०-११ मध्ये परीक्षांच्या पेपरफुटीबाबत कायदा करण्याचे नियोजन केले होते, परंतु तो सादर करण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते. मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने २०२४ मध्ये असा कायदा आणला आणि नंतर त्यात सुधारणा करून तो अधिक बळकट केला. या सुधारणांमुळे कठोर शिक्षा आणि जलदगती न्यायालयात खटले चालवण्याची तरतूद करण्यात आली, असे गोयल (Piyush Goyal) म्हणाले.
काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्ष यांसारख्या विरोधी पक्षांनी संसदेत या कायद्याला विरोध केला होता. मतदार त्यांना वारंवार नाकारत असल्याने त्यांची निराशा आणि हताशपणा मी समजू शकतो. ते एकापाठोपाठ एक निवडणुका हरत आहेत. जेव्हा या विधेयकावर चर्चा होत होती, तेव्हा त्यांनी त्याला पाठिंबा द्यायला हवा होता. या विधेयकाला विरोध केल्याबद्दल मी काँग्रेस, समाजवादी पक्ष, आपचा निषेध करतो, असे ते म्हणाले.






