Piyush Goyal : पियुष गोयल कॅनडा दौऱ्यावर; द्विपक्षीय व्यापार 50 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे लक्ष्य
Piyush Goyal :

Piyush Goyal : वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल गुंतवणूक मिळवण्यासाठी, सहकार्य वाढवण्यासाठी आणि प्रस्तावित मुक्त व्यापार कराराच्या (एफटीए) चर्चेला गती देण्यासाठी कॅनडाला भेट देणार आहेत.
ते म्हणाले की, ओटावा आणि टोरोंटो येथे नेते आणि व्यावसायिकांसोबत अनेक बैठका नियोजित आहेत. गोयल कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट घेतील आणि त्यांचे कॅनेडियन वाणीज्य मंत्री मनिंदर सिद्धू यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतील. गोयल म्हणाले की, ते कॅनडाच्या मेपल 8 पेन्शन फंडांच्या प्रतिनिधींनाही भेटतील.
मेपल 8 एकत्रितपणे सुमारे 2.4 ट्रिलियन कॅनेडियन डॉलर्सच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करतात आणि जगातील सर्वात प्रभावशाली दीर्घकालीन गुंतवणूकदारांपैकी एक मानले जातात. ते पुढे म्हणाले की, कॅनडा तेल, वायू, महत्त्वपूर्ण खनिजे आणि खाणकाम या क्षेत्रांत मजबूत आहे. सध्या भारतात सुमारे 600 कॅनेडियन कंपन्या कार्यरत आहेत आणि आम्ही ही संख्या 1,000 पर्यंत वाढवण्याचा विचार करत आहोत. पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार 50 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले. 2024-25 मध्ये हा व्यापार 8.66 अब्ज डॉलर्स होता (4.22 अब्ज डॉलर्स निर्यात आणि 4.44 अब्ज डॉलर्स आयात).
दोन्ही देश सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर वाटाघाटी करत आहेत. वाटाघाटींच्या दोन फेर्या पूर्ण झाल्या आहेत. कॅनडा हे 41.65 दशलक्ष लोकांची बाजारपेठ असून, र्कनडाचा जीडीपी 2.34 ट्रिलियन अमेरिकी डॉलर आहे.
भारतातून कॅनडाला होणार्या निर्यातीमध्ये औषधे, लोखंड आणि पोलाद, सागरी खाद्यपदार्थ, सुती कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि रसायने यांचा समावेश आहे. प्रमुख आयातीमध्ये कडधान्ये, मोती आणि मौल्यवान खडे, कोळसा, खते, कागद आणि कच्चे पेट्रोलियम यांचा समावेश आहे.





