India-China: प्रथम व्यापार युद्ध आणि आता अमेरिका- इराण युद्ध या कारणामुळे जागतिक आर्थिक समीकरणे बदलण्याची लक्षणे दिसून येत आहेत. भारत आणि चीन दरम्यान सरहद्दीवरून निर्माण झालेले मतभेद दोन्ही देश विसरून आर्थिक क्षेत्रात सहकार्य करण्यास तयार असल्याचे वातावरण निर्माण होत आहे. चीनचे अर्थमंत्री वँग यी यांनी सांगितले की आशियातील या दोन बलाढ्य देशांना सहकार्य करण्यास मतभेदापेक्षा जास्त भाव आहे. भारताचे चीनमधील राजदूत प्रदीप कुमार रावत यांना निवृत्तीनंतर निरोप देण्याच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, भारत आणि चीनने परस्परांना पूरक भूमिका घेण्याची गरज वाढली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये हे दोन्ही देश सकारात्मक निर्णय घेत असल्याचे दिसून येत आहे. भूराजकीय तनाव व व्यापार युद्धाच्या काळात रावत यांनी चीन आणि भारताचे आर्थिक संबंध वाढविण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले आणि नवीन राजदूतही याच पद्धतीने काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. दोन्ही देशांनी एकमेकाकडे स्पर्धक म्हणून पाहण्यापेक्षा भागीदार म्हणून पाहिल्यास या दोन्ही देशातील आर्थिक प्रश्न अधिक सहजतेने सुटू शकतात. त्याचबरोबर दोन्ही देशादरम्यान मतभेद वाढण्याचे काहीच कारण नाही. काही मतभेद सहज चर्चेद्वारे सोडविले जाऊ शकतात असे त्यांनी सांगितले. या दोन्ही देशांचा विकास झाला तर त्यामुळे जागतिक विकास होण्यास मदत होईल हे दोन्ही देशांना माहीत झाले आहे. त्या दृष्टिकोनातून सकारात्मक पावले उचलली जात आहेत. विशेष म्हणजे सरहद्दीवरील तणावानंतर भारताने चीनमधील गुंतवणूकीला मर्यादा आणल्या होत्या. मात्र आता ह्या मर्यादा भारत सरकारकडून कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून लवकर चीनमधील थेट परकीय गुंतवणूक भारतात वाढेल असे समजले जात आहे.