Piyush Goyal : केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष देशाच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी क्षुद्र राजकारण करत असून, ते भारतविरोधी विदेशी शक्तींच्या हातातील बाहुल्यांसारखे वागत आहेत, असा गंभीर आरोप गोयल यांनी केला. भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गोयल यांनी गांधी कुटुंबाचा उल्लेख तडजोड केलेले कुटुंब असा केला. ते म्हणाले की, गांधी कुटुंबाने नेहमीच देशाच्या हितापेक्षा स्वतःच्या राजकारणाला महत्त्व दिले आहे. याची सुरुवात पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून झाली असून ती परंपरा राहुल गांधींपर्यंत कायम असल्याचे ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या एआय समिटमधील एका निषेध प्रदर्शनाचा संदर्भ देत गोयल म्हणाले की, हे सर्व भारताची वाढती ताकद रोखण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे. देशाची प्रगती ज्या वेगाने होत आहे, ती या नेत्यांना पचनी पडत नाहीये, असा टोलाही त्यांनी लगावला. नकारात्मक राजकारणाचे पोस्टर बॉय : गोयल यांनी राहुल गांधींना नकारात्मक राजकारणाचे पोस्टर बॉय संबोधले. ते म्हणाले की, राहुल गांधी सातत्याने भारताच्या संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधींनी देशाच्या विकासाला अस्थिर करण्यासाठी भारतविरोधी शक्तींशी हातमिळवणी केल्याचा आरोप गोयल यांनी केला. बोफोर्स घोटाळा, कच्चातीवू बेट प्रकरण आणि नेहरूंनी घेतलेले काही निर्णय यांचा दाखला देत गोयल यांनी काँग्रेसवर राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केल्याचा आरोप यावेळी केला. हे देखील वाचा : Bhigwan News : गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप अडचणीत? ‘हे’ प्रकरण भोवणार?