Pimpri : मळवली उड्डाणपुलाच्या नवीन आराखड्यास ग्रामस्थांचा विरोध

कार्ला : मळवली रेल्वे स्टेशन येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या नवीन आराखड्यास मळवळी ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी विरोध दाखवत नामंजुरी दर्शवली आहे. उड्डाणपुलाच्या नवीन आराखड्याविरोधात मळवली ग्रामस्थांसह पाटण, बोरज, भाजे, देवले, सदापूर आणि या भागातील इतर गावातील नागरिकांनी नापसंती दाखवत एकमताने विरोध केला आहे.
नुकतीच मळवली ग्रामपंचायतीने ग्रामसभा बोलावून उड्डाणपुलाच्या नवीन आराखड्याच्या विरोधात ठराव मंजूर केला. तसेच, उड्डाणपुल व्हावा परंतु जुन्या आराखड्यानुसार पुलाचे काम करावे, असाही ठराव मंजूर केला आहे.
सन २०१२ साली रेल्वे प्रशासनाच्या पत्रानुसार पूर्वी मंजूर केलेला उड्डाणपुल कायम करण्यात यावा, सन २०१९/२० साली सर्वेनुसार केलेल्या आराखडा (नकाशा) प्रमाणे ग्रामसभेमध्ये सर्वानुमते ठरावाला मंजुरी देण्यात आली. तसेच नवीन आराखडा सर्वानुमते नामंजूर करण्यात आला, असे पत्र मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, डिव्हिजन रेल्वे मॅनेजर पुणे, जिल्हाधिकारी पुणे, तहसीलदार मावळ, डेप्युटी चिफ इंजिनियर कन्स्ट्रक्शन पुणे, गटविकास अधिकारी मावळ यांना मळवली ग्रामपंचायतीकडून देण्यात आले आहे.





