Pimpri : रोहित्र चोरीच्या घटनांनी कान्हे ग्रामस्थ हैराण

कान्हे : कान्हे गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी बसविण्यात आलेले विद्युतरोहित्र (ट्रान्सफॉर्मर) चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे मागच्या दोन महिन्यातील ही दुसरी घटना असून वारंवार रोहित्र चोरीला जाण्याच्या घटनांनी कान्हे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. आता चोरीला गेलेल्या ट्रान्सफॉर्मरवरून गावासाठी इंद्रायणी नदीतून पाणीपुरवठा होत होता. परंतु रोहित्र चोरीस गेल्याने हा पाणीपुरवठा ठप्प झाला असून यामुळे कान्हे – नायगाव ग्रामस्थांची गौरसोय होत आहे.
कान्हे – नायगाव गावात मोठी लोकवस्ती आहे. जवळच काही कंपन्या व औद्योगिक वसाहत आहे. याठिकाणच्या पाणीपुरवठ्यावर जवळपासचे मोठे क्षेत्र अवलंबून आहे. मात्र विद्युत रोहित्र चोरीस गेल्याने सर्वांचेच आता पाण्याअभावी हाल होणार आहे. तसेच सध्या रब्बी पिकांना पाण्याचा पुरवठा करण्याची गरज पडते. यामुळे विद्युतपुरवठ्या अभावी विजेवर चालणारे पाण्याचे पंपही बंद पडणार असल्याने शेतकरीही काळजीत आहेत.
रोहित्र चोरीच्या घटनांमुळे गावचा पाणीपुरवठा तसेच शेतकर्यांच्या शेतीचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. नदीचे पाणी वापरता येत नाहीये. शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कान्हे भागात विद्युत रोहित्र, केबल, पंप चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा
मागील दोन महिन्यात दोनवेळा रोहित्र चोरीस गेल्याने प्रशासन देखील हैराण झाले आहे. शहर किंवा गावभागाच्या तुलनेत निर्जनस्थळी असलेल्या ठिकाणी रोहित्र असल्याने ते चोरीला जात आहे. ही चोरी थांबविण्यासाठी ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी सतर्क राहणे, पाळत ठेवणे व रोहित्र चोरी होऊ नये म्हणून पुढाकार घेणे गरजेचे आहे.
विद्युत रोहित्र चोरीला जाऊ नये म्हणून महावितरणकडून रोहित्र वेल्डिंग करण्यात येते. परंतु चोरटे वेल्डिंग तोडून रोहित्र चोरून नेत आहेत. पोलीस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. डिसेंबर महिन्यनंतर आता जानेवारी महिन्यातही रोहित्र चोरीला गेले आहे. महावितरणने लवकर दुसरे रोहित्र बसवून ग्रामस्थांची पाण्यावाचून होणारी गैरसोय दूर करावी.
-विजय सातकर, सरपंच, कान्हे-नायगाव





