Pimpri : वडगाव नगरपंचायतीचा शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर !

वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीत सध्या प्रशासकीय राज सुरू असून या प्रशासकीय कालावधीत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी मंजूर करण्यात आला. ११ लाख ६७ हजार ५०१ रुपये शिलकीसह एकूण ९८ कोटी ७९ लाख ३३ हजार ८७ रुपयांचा अर्थसंकल्प प्रशासकीय ठरावाद्वारे मंजूर करण्यात आला आहे.
अर्थसंकल्पाचे विवरण पाहिले असता, नगरपंचायतीकडे प्रारंभाची शिल्लक ही ४ कोटी ८९ लाख ६७ हजार १०१ रुपये असून, त्यात महसूली उत्पन्न, शासनाकडून मिळणारे अनुदान, इमारती व जागा भाडे, फी व आकार, विक्री व भाडे करणारे आणि इतर उत्पन्न स्त्रोतातून नगर पंचायतीला एकूण २४ कोटी २ लाख ७९ हजार ४८७ रुपये एकूण उत्पन्न अपेक्षित आहे. त्यातून महसूली खर्च, अपंग कल्यणाकारी योजना, दुर्बल घटक, महिला व बालकल्याण योजना आदींचा खर्च हा २५ कोटी ८६ लाख ७७ हजार ३२७ रुपये इतका आहे.
नगर पंचायतीची सन २०२५-२६ काळात भांडवली जमा (विकास कामे अनुदान) राशी ही ६९ कोटी ९८ लाख ६३ हजार १ रुपये अपेक्षित असून भांडवली खर्च ७२ कोटी ९२ लाख ५५ हजार ७६० रूपये इतका असेल.
नगरपंचायतीचा एकूण अर्थसंकल्प लक्षात घेता प्रारंभीची शिल्लक, महसुली जमा, भांडवली जमा राशी ही ९८ कोटी ९१ लाख ५८९ रुपये अपेक्षित असून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षांत नगरपंचायत महसुली खर्च व भांडवली खर्च वगळून ११ लाख ६७ हजार ५०२ रुपये शिल्लक असतील. असा एकूण ९८ कोटी ९१ हजार ५८९ रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प नगरपंचायतीने शुक्रवारी मंजूर केला.
या विकासकामांवर नगरपंचायत खर्च करणार
पाणीपुरवठा योजना (११५० लक्ष), पाणीपुरवठा जलवाहिनी व जलशुध्दीकरण केंद्र (२५३ लक्ष), रस्ते (१८७० लक्ष) प्रशासकीय इमारत (१२५ लक्ष), घनकचरा व्यवस्थापन (१७५ लक्ष), स्वच्छता अभियान / माझी वसुंधरा अभियान खर्च (७४५ लक्ष) तलाव, नाले व विहीर संवर्धन व सुशोभिकरण (१०० लक्ष), ड्रेनेज नेटवर्क (५० लक्ष), विद्युत व्यवस्था (५२ लक्ष) महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान अंतर्गत खर्च (२०० लक्ष), ई-चार्जिंग स्टेशन उभारणे (५ लक्ष), जमीन संपादन करणे (३३५ लक्ष), सांडपाणी प्रकल्प डीपीआर (२०० लक्ष) आणि विशेष सहाय्य योजनेंतर्गत मल्टीपर्पज हॉल व शॉप बांधणे (४८२ लक्ष).
अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
१. नवीन पाणीपुरवठा योजना लवकर पूर्ण करणे
२. घनकचरा प्रकल्प अहवालची अंमलबजावणी करणे.
३. शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे.
४. दिव्यांग तसेच दुर्बल घटक कल्याण निधीची तरतूद.
५. महिला व बालकांना स्वसंरक्षण, योगाचे धडे देणार.
६. कर्मचारी अपघात विमा करिता भरीव तरतूद.
७. तलाव, नाले व विहिर संवर्धन व सुशोभीकरणासाठी तरतूद.
८. शहरात ७.५ कोटी रुपयांचे शॉपिंग सेंटर बांधणे.





