Pimpri : म्हाडा सदनिकांच्या सोडतीला आज मिळाला मुहूर्त

पिंपरी : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सदनिकांच्या ऑनलाइन सोडतीचा शुभारंभ उद्या (दि. २९) रोजी दुपारी एक वाजता राज्य शासनाकडून केला जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सदनिकांची सोडत काढण्याचा शुभारंभ १० ऑक्टोबर २०२४ रोजी सभापती शिवाजी आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला होता. जाहिरातीमध्ये एकूण ६ हजार ४२० सदनिकांचा समावेश करण्यात आला होता. त्यापैकी २ हजार ७५८ सदनिकांचा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, पंढरपूर येथील म्हाडा योजनेची २८, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील म्हाडा योजनेची ६५ आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ३ हजार ५६९ सदनिकांचा सोडतीसाठी समावेश करण्यात आला होता. अर्जदारांच्या विनंतीनुसार तसेच दिवाळी व विधानसभा निवडणुकांमुळे अर्ज भरण्यासाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडत गेली.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेमधील २ हजार ७५८ सदनिकांसाठी सुमारे १ हजार ३७५ अर्ज प्राप्त झाले आहेत. सोडतीसाठीच्या ३ हजार ६६२ सदनिकांसाठी एकूण ९३ हजार ६६२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामधील ७१ हजार ६४२ अर्जदारांनी अनामत रक्कमेचा भरणा केलेला आहे. त्यांचा सोडतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या अर्जदारांसाठी सोडत होणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेतील शरदचंद्र पवार सभागृहात नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ज्या अर्जदारांना प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणे शक्य नाही. त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त संदेशामध्ये मिळालेल्या युट्यूब युआरएलवरुन सोडतीचा कार्यक्रम ऑनलाइन बघता येणे शक्य आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.





