Pimpri : शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे आरोग्य आणि सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका नेहमी प्राथमिकता देत आली आहे, असे मत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्येक्त केले. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ होणार आहे. या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्यानुषंगाने कर्मचाऱ्यांना आरोग्य व सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यासाठी पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे स्वच्छ्ता क्षमता बांधणी कार्यशाळा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उप आयुक्त सचिन पवार, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी अंकुश झीटे, मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीराम गायकवाड, सहाय्यक आरोग्य निरिक्षक शांताराम माने, शशिकांत मोरे यांच्यासह महापालिकेच्या ग, ड व ह क्षेत्रीय कार्यालयांमधील सफाई कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य निरीक्षक व सफाई मित्र यांनी स्वच्छता करताना सुरक्षा साधनांचा वापर करावा. आरोग्याच्या चांगल्या सवयी अंगी आत्मसात कराव्यात, आरोग्याची वेळोवेळी तपासणी करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. त्याचबरोबर त्यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२४ ची माहिती दिली, आणि कामकाज चांगल्या प्रकारे व वेळेत कसे पूर्ण करावे, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात स्वच्छता मित्रांचा सन्मान करण्यात आला. तसेच, ‘काम फाऊंडेशन’ यांच्याकडून क्षेत्रीय कार्यालय ग, ड, ह मधील मनपा, ठेकेदार व कंत्राटी सफाई कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले तसेच त्यांच्याकडून सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई कीटचा वापर करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छ भारत अभियान “क्षमता बांधणी, कौशल्य विकास व ज्ञान व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करण्यात आले.