Pimpri : हापूसचा हंगाम आणखी दहा पंधरा दिवसांचाच

पिंपरी : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर वास्तविक हापूस आंबा मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध झाला होता. परंतु, आता हापूस आंब्यांचा हंगाम आणखी केवळ दहा ते पंधरा दिवसांचाच आहे, अशी माहिती आंबा व्यापार्यांनी दिली.
कोकणच्या हापूस आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात असून, पुढील केवळ दहा दिवस हा सुगंधी आणि चवदार आंबा बाजारात उपलब्ध असेल, अशी माहिती व्यापार्यांनी दिली आहे. यंदा हवामानातील बदलांमुळे हापूसचे उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी आहे. त्यामुळे येत्या 15 ते 20 मे पर्यंतच हापूसचा आस्वाद घेता येणार आहे. किरकोळ बाजारात सध्या पाच डझनाची पेटी 2300 ते 2500 रुपये आणि चार डझनाची पेटी सुमारे 2500 ते 2700 रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहे. प्रतवारीनुसार हापूसची विक्री होत आहे. याशिवाय 150 ते 200 रुपये प्रतिकिलोनेदेखील विक्री होत आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला हापूसला नेहमी मोठी मागणी असते. मात्र, यंदा बाजारात पुरेसा आंबा उपलब्ध झाल्याने ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर आंबा खरेदी करण्यात आला, असे व्यापार्यांनी सांगितले.आहे.
साक्यामुळे दर्जा घटला
साधारणपणे जून महिन्यापर्यंत चालणारा हापूसचा हंगाम यंदा 15 ते 20 मे पर्यंतच संपण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यातच हवामान बदलामुळे कोकणातील हापूस आंब्यात साका (आतील गर आंबट व पांढरा होणे) निघण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आंब्याच्या दर्जावर आणि उत्पादनावर परिणाम झाला असून, 20 ते 30 टक्के आंबा खराब निघत असल्याने व्यापार्यांचे नुकसान होत आहे, असे व्यापार्यांनी सांगितले.
हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी शक्यतो आपल्या ओळखीच्या किंवा विश्वासू हापूस विक्रेत्याकडूनच आंबा खरेदी करावा, असे विक्रेत्यांनी केले आहे. तर बाजारात मोठ्या प्रमणावर कर्नाटक हापूस दाखल होत असल्याचे चित्र आहे.





