Pimpri : मुळशीत स्वस्त जागेचा सौदा’ ठरत आहे फसवणुकीचा धंदा!

हिंजवडी : मुळशीतील निसर्गरम्य डोंगराजवळ किंवा धरणाच्या शेजारी अगदी स्वस्त दरात जमीन मिळत असल्याचे दाखवणाऱ्या सोशल मीडियावरील रिल्सकडे पिंपरी चिंचवडमधील अनेकांचे लक्ष वेधले जाते. ‘फक्त ४०-५० हजार रुपये गुंठा’, ‘चार ते पाच लाख एक एकर जमीन’ अशा आकर्षक जाहिराती पाहून हिंजवडीतील आयटीयन्स किंवा पिंपरी चिंचवड शहरातील अनेकजण मुळशीत जमीन पाहण्यासाठी जातात. मात्र प्रत्यक्षात ही ऑफर म्हणजे फसवणुकीचा सापळा असल्याचे समोर येत आहे.
काश्मिरमध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या भारत पाकिस्तान युद्ध यामुळे अनेकांनी तिथे जाण्याचा बेत रद्द केला. त्याऐवजी जवळच्या जवळ मुळशी तालुक्यात जाऊन येऊ आणि एखादी जागाही बघू, असे म्हणत पिंपरी चिंचवड शहरातील अनेकजण मुळशीत जाण्याचा बेत आखत आहेत. मुळशीत घर किंवा प्लॉट घेण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन अनेकजण सुट्टीच्या किंवा वीकेंडच्या दिवशी तेथील एखादी जागा पाहण्यासाठी निघतात. समाजमाध्यमांवरील व्हिडिओ, रिल्सवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधल्यावर ‘जमीन स्वस्तात आहे’, ‘आता बघून ठेवा नाहीतर पुढे महाग होईल’ अशा प्रकारची गोड बोलेल आश्वासने दिली जातात.
पुढे ठरलेल्या पत्त्यावर पोहोचल्यावर एजंटचा माणूस भेटतो आणि जागा दाखवण्यासाठी ५०० ते २ हजार रुपये ‘दाखवणी फी’ म्हणून घेतो. ग्राहक जागा पाहायला तयार होतो, तेव्हा त्याला गावापासून ५-१० किलोमीटर आत एखाद्या डोंगर उतारावर, झाडीने वेढलेल्या जागेवर नेले जाते. “हीच ती संधीची जागा!” असे सांगून प्लॉट दाखवला जातो.
खरंतर ती जागा बहुतेक वेळेस अडगळीची, पडीक, विकास शक्य नसलेली असते. काही वेळा दुसरी जागा दाखवण्याचे नाटकही होते. अखेर ग्राहक वैतागून परततो. एजंट मात्र ‘तुम्ही जागा पसंत केली नाहीत, आमचं काम जागा दाखवण्याचं होतं’ असे म्हणून पैसे उकळतो.
या फसवणुकीचा उद्देश मोठ्या व्यवहाराचा नाही, तर छोट्या रकमेतून अनेकांकडून पैसे मिळवण्याचा असतो. त्यामुळे अशा प्रकारांनी त्रस्त झालेले लोक तक्रारही करत नाहीत.
“जागा खरेदी करताना अधिकृत एजंट, कायदेशीर प्रक्रिया आणि जागेची खातरजमा करूनच पुढे जावे. सोशल मीडियावरच्या स्वस्तात सौद्यांमागे फसवणूक लपलेली असू शकते,” असा इशारा मुळशी तालुक्यातील शेतकरी तसेच सामाजिक कार्यकर्ते देत आहेत.
आयटीयन्सला भुरळ घालण्याचा प्रयत्न
चांदणी चौक पासून ते हिंजवडी पर्यंत ठिकठिकाणी मुळशीतील प्लॉट विक्रीच्या जाहिराती लावण्यात आल्या आहेत. यातून आयटी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न यातून होत आहे.
माहिती घेऊनच व्यवहार करा
मुळशी तालुक्यात जागा खरेदीसाठी जाणाऱ्यांनी सोशल मीडियावरच्या चककदार जाहिरातींना भुलून न जाता, आधी योग्य पडताळणी करूनच पुढे जावे. अनेकदा एकाच जमिनीची अनेकांना विक्री करून फसवणूक झाल्याच्याही तक्रारी आहेत. अन्यथा ‘स्वस्तात जमीन’ हे स्वप्न ‘खोट्या व्यवहाराचा फसवणूक प्रसंग’ ठरू शकतो.





