Pimpri: ….आमच्यासाठी तो विषय संपला – प्रशांत शितोळे
Pimpri: ६० कोटींचा घोटाळा प्रकरण

Pimpri : पिंपरी चिंचवड महापालिकेतील लेखा विभागात बोगस उपसूचना देत ६० कोटींचा घोटाळा झाला. हा घोटाळा राज्यभर गाजत असतानाही यामधील दोषींवर कोणतीही कारवाई झाली नाही. पारदर्शक कारभाराच्या गप्पा करणाऱ्या भाजपाने देखील याचा पाठपुरावा केला नाही.
तर, सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी आमच्यासाठी तो विषय संपला असे वक्तव्य करत बेजबाबदारपणाचा कळस गाठला. वेगवेगळ्या १४ बोगस उपसूचनांद्वारे तब्बल ६० कोटी रुपयांची बिले ठेकेदारांना मार्चअखेर अदा करण्यात आली. यामध्ये दोषी असलेल्या अधिकारी, कर्मचारी व नगरसेवकांवर कारवाई अपेक्षित असताना फक्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांची बदली करण्यात आली.
एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये बदली ही कारवाई असू शकत नाही. असे असतानाही सत्ताधारी भाजपाने या विषयात नरमाईची भूमिका घेतली. बनावट कागदपत्रे महापालिकेत तयार करत तब्बल ६० कोटी रुपये ठेकेदारांना अदा केले. याची चौकशी सुरू असताना या चौकशी अहवालामध्ये ठेवी बँकांमध्ये ठेवत असताना ७ कोटी रुपयांचे महापालिकेचे नुकसान झाले असल्याचे समोर आले.
मात्र, तरीही पारदर्शकपणाच्या गप्पा मारणाऱ्या भाजपाने यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांकडून ते वसूल करण्याची मागणी केली नाही. तर ६० कोटींच्या घोटाळ्यात दोषी असलेल्या इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी प्रशासनाला धारेवर धरले नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या घोटाळ्याचे भाजपाला काहीच गांभीर्य नसल्याचे समोर आले होते.
त्यात भर मंगळवारी (दि. ३०) सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी आमच्यासाठी तो विषय संपला असे जाहीर करत बेजबाबदार वक्तव्य केले. ते म्हणाले, आमच्यासाठी ६० कोटींचा घोटाळा हा विषय संपला आहे. त्यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्याची बदली झाली आहे.
आयुक्तांना त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार नव्हते. यामध्ये शहराची बदनामी झाली आहे. त्यामुळे तो विषय आता संपला.
Pune District : शेताच्या बांधाच्या वादातून शेतकर्यावर जीवघेणा हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा





