Pimpri : ‘पालकांना वेठीस धरणाऱ्या शाळांवर कारवाई करा’

तळेगाव दाभाडे : पालकांना वेठीस धरून आम्ही सांगू त्या दुकानातूनच शालेय वस्तू, गणवेश, शूज खरेदी करा असा आग्रह करणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर कडक कारवाई करून पालकांना वेठीस धरणाऱ्या शाळांची मान्यता काढून घ्यावी किंवा दंडात्मक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार विक्रम देशमुख यांना माहिती अधिकार कार्यकर्ते अरुण माने आणि जयंत कदम यांनी दिले आहे.
पालकांनी विद्यार्थ्यांची वह्या-पुस्तके, गणवेश शाळेतूनच घ्यावे किंवा आम्ही सांगू त्या दुकानातून घ्यावेत, अशी सक्ती शहरातील इंग्रजी माध्यमाच्या बहुसंख्य शाळा करीत आहेत. अवास्तव दरात साहित्य विक्री करून शाळा आणि विक्रेते प्रचंड नफेखोरी करीत आहेत. राजरोस हे घडत असतानाही शिक्षण विभाग त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे. अशा शाळांवर कधी कारवाई होणार? असा प्रश्न निवेदनामध्ये करण्यात आला आहे.
अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित, कायम विनाअनुदानित खासगी प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्याचवेळी ठराविक प्रकाशकांचे शैक्षणिक साहित्य, लोगो असलेला गणवेश, स्कूल बॅग, शूजचा स्वतंत्र पॅटर्न शाळांनी तयार केला आहे. हे साहित्य शाळेव्यतिरिक्त विशिष्ट ठराविक दुकानांमध्येच मिळत आहे. यामध्ये मावळ तालुक्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा पुढील प्रमाणे; पोद्दार इंटरनॅशनल स्कूल तळेगाव , इडन इंटरनॅशनल स्कूल आंबी, हाचींग इंग्लिश मीडियम स्कूल तळेगाव , डी.वाय. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, हाय व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल सोमाटणे फाटा, इम्प्रास इंटरनॅशनल स्कूल तळेगाव आणि माउंट सेंट तळेगाव यांच्याबाबत तक्रार नोंद केली असून शाळेतूनच अथवा आम्ही सांगेन त्याच दुकानातून शालेय शैक्षणिक वस्तू खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या शाळांवर कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदनामध्ये नमूद आहे.
सदर निवेदनाच्या प्रती शिक्षण मंत्री दादाजी भुसे, जिल्हाधिकारी पुणे, तहसीलदार मावळ, गटशिक्षणाधिकारी मावळ, आमदार मावळ, प्रशासन अधिकारी तळेगाव दाभाडे, पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे यांना देण्यात आल्या आहेत.





