Pimpri : उन्हाची काहिली, शीतपेयांची मागणी वाढली

कामशेत : उन्हाळा सुरू झाल्यामुळे थंड पाण्यासह विविध शीतपेयांची मागणी वाढली आहे. परंतु बाटलीबंद पाणी असो किंवा अन्य शीतपेय यांची छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. कुलिंग चार्जेसच्या नावाखाली एका बाटलीमागे पाच ते दहा रुपये दुकानदार जास्तीचे घेत आहेत. अशा दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नियमानुसार कोणतीही पाकीटबंद, बाटलीबंद वस्तू किंवा पदार्थ हा छापील किमतीनुसार विक्री करणे बंधनकारक आहे. परंतु असे असताना उन्हाळ्यात शीतपेयांची विक्री ही छापील किमतीपेक्षा अधिक दराने होत असून कुलिंग चार्जेसच्या नावाखाली है वाढीव पैसे घेण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मुळात एमआरपी किंमतीत सर्व चार्जेस असतात, त्यामुळे वेगळे चार्जेस देण्याची आवश्यकता नसते.
कुलिंग चार्जेससह शीतपेयाची किंमत ठरविली जाते, त्यामुळे ग्राहकांनी अतिरिक्त कुलिंग चार्जेस देऊ नयेत. तसेच पैसे जास्त घेतल्यास तक्रार करता येऊ शकते. छापील किमतीपेक्षा अधिक दराने पदार्थाची विक्री करणे बेकायदेशीर आहे, अशा पद्धतीने वाढीव दराने शीतपेयाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध नागरिक ग्राहक आयोगाकडे तक्रार करू शकतात.
इथे करा तक्रार…
उन्हाळ्यात अनेक लहान दुकानांवर कुलिंग चार्जेस म्हणून शीतपेयाच्या बाटलीमागे पाच ते दहा रुपये अधिकचे आकारले जातात. पाण्याच्या बाटलीची विक्रीही अशाचप्रकारे काही ठिकाणी होत असते. प्रत्येक नागरिकाने ग्राहक अधिकारांविषयी जागरुक राहणे गरजेचे आहे. वस्तू किंवा सेवा खरेदी करताना मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे घेतले असल्यास ग्राहक आयोगाकडे दाद मागता येते. त्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तक्रार करता येते.





