Pimpri : आकुर्डीत सोळा तासांचा अंधार!

आकुर्डी : वादळी वाऱ्यांसह कोसळलेल्या अवकाळी पावसाने आकुर्डीगाव परिसराचा तब्बल १६ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच वीज पुरवठा खंडीत झाल्याने इमारतीमधील पाणी पुरवठाही ठप्प झाला होता.
पावसामुळे झाडांची फांदी तुटून वीजयंत्रणेवर कोसळली, तर काही भागात फिडर व रिंग मेन युनिटमध्ये पाणी शिरल्याने यंत्रणा ठप्प झाली. अशा वेळी महावितरणने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याऐवजी फोन बंद ठेवले, अशी तक्रार स्थानिकांनी केली.
“वादळ आले की वीज जाते, हे आता नेहमीचं झालंय. पण यावेळी तर १६ तास वीज नव्हती. फोन लावले तर कोणी उचलत नव्हतं,” अशी प्रतिक्रिया एका संतप्त रहिवाशाने दिली.
याशिवाय, विजेअभावी पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाल्याने नागरिकांना दुहेरी झळ सोसावी लागली. महावितरणच्या म्हणण्यानुसार “वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळणे, पाणी शिरणे व सुरक्षेच्या दृष्टीने काही ठिकाणी वीजपुरवठा बंद करावा लागतो. मात्र लवकरात लवकर काम पूर्ण करून वीज सुरळीत केली जाते.”
तथापि, वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडीतमुळे नागरिक हैराण झाले असून, महावितरणने ठोस उपाययोजना करून भविष्यातील अंधार रोखावा, अशी मागणी होत आहे.





