Pimpri : मावळ तालुक्यात रब्बी हंगामातील पिके चांगल्या स्थितीत

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांची स्थिती उत्तम असून ही पिके चांगली जोमाने वाढत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी दिली. मावळ हा जरी खरीप भात पिकासाठी प्रसिद्ध तालुका असला तरीही तालुक्यात रब्बी पिकाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे.
मावळ तालुक्यात खरिपाचे जवळपास पाच ते साडेपाच हजारे हेक्टर क्षेत्र आहे. सर्वदूर क्षेत्रात तेथील शेतकरी वेगवेगळी पिके घेत असतात. मावळच्या पूर्वपट्ट्यात भात काढणी झाल्यावर शेतकरी रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, वाटाणा, मसूर यांसारखी रब्बी पिके घेतात. या भागात ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे क्षेत्र मोठे असून अलीकडे इतरही पिकांचे उत्पादन घेतले जात आहे.
या भागातील सांगवडे, दारुंब्रे, साळुंब्रे, गहुंजे, शिरगाव, गोडुंब्रे, धामणे, परंदवडी, बेबडओहोळ,चांदखेड, पाचाणे, पुसाणे तसेच इंदोरी, माळवाडी, नवलाख उंब्रे, वराळे, नाणोली या भागात रब्बी ज्वारी, गहू, हरभरा या पिकाची स्थिती अतिशय चांगली असल्याचे सहाय्यक कृषि अधिकारी विकास गोसावी यांनी सांगितले.
चांगला पाऊस व पोषक वातावरण
मावळ तालुक्यात यंदा मान्सूनचा पाऊस चांगला झाला होता. यानंतर परतीचा पाऊसही बऱ्यापैकी बरसला. ज्या रब्बी पिकांच्या पेरण्या मान्सूनचा परतीचा पाऊस येण्यापूर्वी झाल्या ती पिके आता अंतिम टप्प्यात असून ज्यांच्या पेरण्या परतीच्या पावसाच्या नंतर झाल्या ती पिके राखणीसाठी तयार झालेली आहेत. त्यामुळे एकंदरीत मावळ तालुक्यात रब्बी पिकाची परिस्थिती अतिशय उत्तम आहे.





