Pimpri : अनुकूल वातावरणामुळे रब्बी पिके जोमात

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील रब्बी ज्वारी, गहू या पिकांचा हंगाम जवळजवळ संपत आलेला असून यावर्षी अनुकूल वातावरणामुळे शेतीमध्ये उत्पादन चांगले झाल्याने शेतकरी वर्गात आनंदोत्सव आहे.
मावळ तालुका हा खरीप भात पिकांचा तालुका असतानाही मावळ तालुक्यात रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, मसूर, वाटाणा ही पिके ही साधारणपणे ५ हजार हेक्टरवर घेतली जातात. यावर्षी मावळ तालुक्यात १३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेतले होते. तर रब्बी ज्वारी ७५० हेक्टर, गहू ३१२ हेक्टर, हरभरा ३४९ हेक्टर, मसूर ४२६ हेक्टर, बांधावरील घेवडा, पावटा दोनशे हेक्टरवर अशी पिके शेतकऱ्यांनी घेतली होती. वेळोवेळी पडलेल्या अनुकूल पावसामुळे आणि शेतकऱ्यांच्या देखभालीमुळे यावर्षी रब्बी हंगामाचे पीक चांगले आलेले असून शेतकरी यामुळे आनंदी आहे.
मावळ तालुक्याचे कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकरी खरीप व रब्बी पिकांच्या पेरण्या करीत असतात तसेच मार्गदर्शनामुळे अधिक उत्पादन कसे मिळेल हे पाहत असतात. यावर्षी तालुक्यातील रब्बी हंगामातील हरभरा, मसूर यांच्या काढण्या साधारणपणे दोन महिन्यापूर्वी पूर्ण झाल्या आहेत, तर तालुक्यातील रब्बी ज्वारी आणि गहू यांच्या काढण्या फेब्रुवारी महिन्यातच शेतकऱ्यांनी पूर्ण केलेल्या आहेत.
मात्र, काही ठिकाणी उशिरा पेरलेल्या ज्वारी व गव्हामुळे या पिकांच्या काढणीचा अखेरचा टप्पा सध्या चालू असून मार्च अखेर पर्यंत रब्बी पिकांच्या सर्व काढण्या पूर्ण होतील, असा अंदाज सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय ढुमणे यांनी व्यक्त केला आहे.





