Pimpri : थंडी ओसरली, रब्बी पिकांना फटका बसण्याची भीती

नाणे मावळ : परिसरात ढगाळ वातावरणामुळे वातावरणातील उष्णता वाढली असून थंडीची तीव्रता घटू लागली आहे. या बदलत्या हवामानाचा फटका रब्बी पिकांना बसण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
मागील आठवड्यात नाणे मावळ परिसरात थंडीचा कडाका वाढला होता. नाणे मावळ हा परिसर डोंगर, धरणे, नदी – ओढे असलेला परिसर आहे. यामुळे या भागात तापमान घसरल्याने वातावरणात चांगलाच गारठा निर्माण झाला होता. रब्बी पिकांसाठी हे वातावरण पोषक होते. परंतु मागील दोन दिवसांपासून आकाशात ढगांची गर्दी होत असल्यावे वातावरणात उष्मा जाणवत आहे.
ढगाळ वातावरणामुळे चालू आठवड्यात थंडीचा जोर काहीसा ओसरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या बदलत्या हवामानामुळे रब्बी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कांदा, गहू, हरभरा या पिकांवर मावा व करपा या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका
नाणे मावळ भागात रब्बी पिकांची उगवण चांगली झाली आहे. यामुळे शेतकरी आवश्यकता असेल तिथे पिकाला पाणी पुरवठा करीत आहे. परंतु हरभरा, गहू, वाटाणा आदी रब्बी पिकांना थंड वातावरण आवश्यक असते, अशात थंडी ओसरू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. सध्याचे हे ढगाळ वातावरण रब्बी पिकांना धोकादायक ठरेल, असे दिसते.





