पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी व्हर्चुअल टाऊन हॉल मीटिंगचे आयोजन केले आहे. हे संवाद सत्र ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या माध्यमातून बुधवारी (दि. २६) सायंकाळी ४ ते ५ या वेळेत घेण्यात येणार आहे.
या संवाद सत्रात पोलिसांसाठी उचलण्यात आलेली परिवर्तनात्मक पावले, पोलीस ठाण्यांतील पायाभूत सुविधा, सायबर युनिट आणि त्याचा परिणाम मजबूत करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे, पोलीस ठाणे आणि कार्यालयांना भेट देताना नागरिकांना चांगल्या अनुभवासाठी सुधारणा करणे आदींचा समावेश असेल.
इतरही विषयांवर प्रश्न विचारता येतील. ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत ते #VirtualTown Hall 2 हा हॅश टॅग वापरून पोस्ट करू शकतात. यापूर्वीही ४ सप्टेंबर २०२४ ला अशा प्रकारे व्हर्चुअल टाऊन हॉल मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते.