Pimpri News | वीज आहे कुठे? कामशेतमध्ये अंधाराचे साम्राज्य ; त्रस्त नागरिकांचा महावितरणला इशारा!

प्रभात वत्तसेवा
कामशेत – परिसरात गेल्या अनेक आठवड्यांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवस असो वा रात्र, कधी वीज येईल आणि कधी जाईल याचा काही ठावठिकाणा नाही. परिणामी, गृहिणींना घरकाम करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे, तर ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी ही स्थिती अत्यंत त्रासदायक ठरत आहे.ऑनलाइन अभ्यास करणारे विद्यार्थी सतत वीज खंडित होण्यामुळे अभ्यासापासून वंचित राहत आहेत.
परीक्षेच्या काळात तर हा त्रास अधिकच जाणवतो. रात्री अंधारामुळे अभ्यास करणे अशक्य होते आणि अशावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहते. वीजपुरवठा नियमित नसल्याने पाणीपुरवठा यंत्रणेवर देखिल त्याचा थेट परिणाम होत आहे. पाण्याच्या टाक्या भरण्यासाठी लागणाऱ्या मोटारी वीजेअभावी बंद पडतात. त्यामुळे अनेकवेळा संपूर्ण गावाला पाण्याचा तुटवडा सहन करावा लागतो. काही वेळा सलग दोन दिवसही पाणी मिळत नाही, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
कामशेत परिसर हा निसर्गरम्य असून त्याला लागून मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. त्यामुळे अनेकदा जंगली प्राणी गावाच्या सीमारेषेपर्यंत येतात. मात्र सतत अंधारात राहावे लागल्यामुळे नागरिकांच्या जीवाला देखील धोका निर्माण होत आहे. वीज नसल्यामुळे रस्त्यांवरील दिवे देखील बंद राहतात आणि रस्ते पूर्णतः अंधारात बुडतात. विशेषतः महिलांना आणि वृद्धांना रात्रीच्या वेळी बाहेर पडणे अत्यंत धोकादायक ठरत आहे.
कारवाईत आघाडीवर, पण सेवा पिछाडीवर..
महावितरणकडून वीजबिल थकल्यानंतर नागरिकांवर तात्काळ कारवाई केली जाते. कनेक्शन कापले जाते, दंड लावला जातो. मात्र, नागरिक वेळेवर बिल भरत असूनही नियमित वीजपुरवठा मिळत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. वेळोवेळी तक्रारी करूनही तांत्रिक बिघाड, लाईन काम सुरू आहे अशा कारणांनी वेळ मारून नेली जाते. मात्र, ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही, अनेकवेळा तर अधिकाऱ्यामकडूनच फोन उचलला जात नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे.
संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा..
सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे सामान्य जनतेच्या जीवनमानावर आणि स्थानिक व्यवसायांवर परिणाम होत आहे. त्रस्त नागरिकांकडून येत्या बुधवारी (दि. १३) महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. महावितरणने खंडित विजसमस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी एकमुखी मागणी नागरिकांतून होत आहे. १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मोर्च्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असून, महावितरणकडून तत्काळ तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.





