Pimpri News | पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेचा नवा फॉर्म्युला! नेतृत्वात केले मोठे फेरबदल ; जाणून घ्या.. कुणाला मिळालं काय?

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – शिवसेनेचे दोन फाड झाल्यानंतर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या शिवसेनेने आपली कार्यकारिणी जाहीर केली होती. नव्या चेहऱ्यांना पसंती देत महत्त्वाची पदे दिली परंतु शहराच्या राजकारणात त्यांची सकि्रयता बिल्कुलच दिसली नाही. क्वचितच पक्षाच्या कार्यक्रमात त्यांची नावे दिसून येत होती. खासदार श्रीरंग बारणे एकहाती पक्षाची धुरा शहरात सांभाळताना दिसून येत होते. अखेर आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाने मोठ्या पातळीवर संघटनात्मक बदल केले आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुखपदी राजेश वाबळे यांची वर्णी लागली आहे. पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदी बाळासाहेब वाल्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा संघटिकापदी शिलाताई भोंडवे यांची नियुक्ती केली आहे.उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या केल्या आहेत. याबाबतची माहिती शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी दिली आहे.
जिल्हाप्रमुख असलेले बाळासाहेब वाल्हेकर यांच्याकडे पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदाची जबाबदारी सोपविली आहे. मावळ तालुकाप्रमुख असलेले राजेश खांडभोर यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपजिल्हाप्रमुख असलेले राजेश वाबळे यांची पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हा संघटिकापदी शिला भोंडवे यांची नियुक्ती केली आहे. तर, मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
“आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल केले आहेत. शिवसेना पुणे जिल्ह्यातील सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार आहे. नवीन पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ लोकसभा मतदारसंघात संघटना आणखी मजबूत होईल. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, महापालिकेत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी झपाटून कामाला लागावे.”
– श्रीरंग बारणे, खासदार, शिवसेना उपनेते





