Pimpri News | शाडू की पीओपी? गणेश मूर्तींच्या संख्येवरून यंदा नागरिकांचा प्रतिसाद कोणाला? जाणून घ्या

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – शहरात शनिवारी (दि. ६) गणेश विसर्जन सोहळा उत्साह, भक्तीभाव आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. दहा दिवसांच्या भक्तीमय उत्सवानंतर “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या गजरात भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. यावेळी घरगुती गणपतींच्या मूर्ती संकलनाला भाविकांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला.
शहरात दहा दिवसांमध्ये तब्बल १ लाख ११ हजार ७९२ गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. त्यामध्ये शाडू मातीच्या मूर्ती फक्त २० हजार ७२८ असून पीओपीच्या तब्बल ९१ हजार २ मूर्ती आहेत. यावरून शाडू मातीच्या मूर्तींला अद्याप मागणी कमीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक उपक्रमांवर विशेष भर दिला होता. त्यासाठी शहरात कृत्रिम जलकुंडे व निर्माल्य संकलन कुंडे उभारण्यात आली होती. दीड दिवसांच्या गणपती विसर्जनापासून मूर्ती संकलन करण्यात येत होते.
या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मोशी येथील खाणीची जागा निश्चित करण्यात आली होती. गेल्या दहा दिवसांमध्ये दीड, पाचवा, सातवा, नववा व दहाव्या दिवशी गणपती मूर्तींचे क्षेत्रीय कार्यालयानुसार संकलन करण्यात आले. शहरात एकूण १,११,७२९ गणेश मूर्तींचे संकलन झाले. त्यामध्ये पर्यावरणपूरक २० हजार ७२८ मूर्ती तर पीओपीच्या ९१ हजार ००२ मूर्तींचा समावेश आहे. प्रभागनिहाय विसर्जनात सर्वाधिक मूर्ती ब प्रभाग (३९,९३९) येथे संकलित झाल्या. त्यापाठोपाठ क प्रभागात १९,८५९, तर फ प्रभागात १७,४९० मूर्तींचे विसर्जन झाले. तुलनेने सर्वात कमी मूर्ती ह प्रभाग (६,०६२) मध्ये संकलित झाल्या.
पालिकेच्या वतीने निर्माल्य संकलन कुंडे उभारण्यात आली होती. नागरिकांनी हार, फुले, पाने व पूजेचे साहित्य थेट नदी-नाल्यात न टाकता निर्माल्य कुंड्यांमध्ये टाकावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. तसेच ‘पुनरावर्तन’ उपक्रमांतर्गत २६ केंद्रांवर शाडू मातीच्या मूर्ती संकलित करून मूर्तिकारांना शाडू माती पुनर्वापर करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय पीओपी मूर्तींसाठी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करून प्रदूषण नियंत्रणाची सोय करण्यात आली होती.
२१५ टन निर्माल्य जमा
विसर्जनानंतर निर्माल्य संकलनाच्या केलेल्या आवाहनाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. क्षेत्रीय कार्यालयानुसार एकूण २१५.७० टन निर्माल्य गोळा करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक संकलन ब कार्यालय (४८.७७ टन) येथे झाले. त्यापाठोपाठ ई कार्यालय (३२.१६ टन) आणि ड कार्यालय (२७.४३ टन) येथे निर्माल्य संकलन झाले.
“निर्माल्य संकलनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. नदीमध्ये निर्माल्य टाकल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. हे टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. संकलित निर्माल्यापासून कंपोस्ट खत व सुगंधी उत्पादने तयार करण्याची योजना महापालिकेकडून हाती घेण्यात आली आहे.”
– सचिन पवार, उप आयुक्त, आरोग्य विभाग.




