Pimpri : धोक्याचे ‘स्पीड ब्रेकर’! अनधिकृत गतिरोधकांचा सुळसुळाट; अपघातांचे संकट गडद
Pimpri : आयआरसीच्या निकषांना हरताळ; रिफ्लेक्टर, सूचना फलकांचा अभाव; दुचाकीस्वारांना गंभीर धोका

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर अपघात रोखण्यासाठी उभारण्यात आलेले गतिरोधकच आता वाहनचालकांच्या जिवावर बेतू लागले आहेत. शहरातील अनेक मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर कोणतेही तांत्रिक निकष न पाळता उभारण्यात आलेल्या अनधिकृत गतिरोधकांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. वाहनांचे नुकसान होत आहे. दुचाकीस्वारांना गंभीर दुखापतींचा सामना करावा लागत आहे.
मात्र, या प्रकाराकडे महापालिका आणि वाहतूक पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांतून व्यक्त होत आहे.
इंडियन रोड्स काँग्रेस (आयआरसी) यांच्या निकषांनुसारच गतिरोधक उभारणे बंधनकारक आहे. उच्च न्यायालयानेही यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत. काही वर्षांपूर्वी शहरातील अनेक बेकायदेशीर गतिरोधक हटविण्यात आले होते.
मात्र, गेल्या काही महिन्यांत पुन्हा अनेक ठिकाणी मनमानी पद्धतीने गतिरोधक उभारण्यात आले आहेत. कोणत्याही तांत्रिक मानकांचे पालन होत नसल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी डांबर, सिमेंट किंवा काँक्रिटचे एक ते दीड फूट उंच उंचवटे तयार करण्यात आले आहेत. त्यांच्या उंची, रुंदी किंवा उताराचे कोणतेही प्रमाण पाळलेले नाही. त्यामुळे वाहन जाताना मोठा धक्का बसतो.
दुचाकीस्वारांचा तोल जातो. चारचाकी वाहनांच्या सस्पेन्शनसह इतर भागांचे नुकसान होत आहे. अनेक नागरिकांना पाठदुखी, कंबरदुखी आणि मणक्याच्या तक्रारीही वाढल्याचे सांगितले जात आहे. रात्रीच्या वेळी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे.
बहुतांश गतिरोधकांवर पांढरे पट्टे नाहीत. रिफ्लेक्टर बसविण्यात आलेले नाहीत. सूचना फलकही लावलेले नाहीत. त्यामुळे अंधारात वाहनचालकांना गतिरोधक दिसत नाहीत. वेगात येणाऱ्या वाहनांचा अचानक तोल जातो. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हे उंचवटे जीवघेणे ठरत आहेत.
शहरातील अनेक सोसायट्यांच्या प्रवेशद्वाराच्या अगोदर आणि नंतर नागरिकांच्या मागणीनुसार नगरसेवकांकडून स्पीड ब्रेकर बसविण्यात आले आहेत. बीआरटी मार्गावरील काळेवाडी फाटा ते केएसबी चौक दरम्यान नढे कॉर्नर, ऑटो क्लस्टर परिसर आणि नव्याने विकसित झालेल्या चौकांमध्येही धोकादायक गतिरोधक उभारण्यात आल्याची तक्रार आहे.
निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते त्रिवेणीनगर, आकुर्डीतील खंडोबामाळ ते थरमॅक्स चौक तसेच शाहूनगर परिसरात अशास्त्रीय उंचवट्यांमुळे चारचाकी वाहने तळाला घासून अडकण्याच्या घटना घडत आहेत.
वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त सर्वेक्षण करून शहरातील सर्व अनधिकृत आणि धोकादायक गतिरोधकांची तातडीने पाहणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. आयआरसीच्या निकषांनुसारच शास्त्रोक्त पद्धतीने गतिरोधक उभारावेत, रिफ्लेक्टर आणि सूचना फलक बसवावेत तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा वाहनचालक आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
गतिरोधक उभारताना या गोष्टींचा विचार होणे गरजेचे
तज्ज्ञांच्या मते, कोणताही गतिरोधक उभारण्यापूर्वी त्या रस्त्यावरील वाहतुकीची घनता, वाहनांचा वेग, शाळा किंवा रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणांचा विचार करणे आवश्यक असते. मात्र, शहरात अनेक ठिकाणी या नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसून येते.
Dehugaon : बेकायदा बांधकाम पुराचे कारण; इंद्रायणी नदीपात्रात भराव टाकून प्लॉट विक्री





