Pimpri News : उत्पन्न कोट्यवधींचे, पण सुविधा शून्य! वीज गेल्याने दस्त नोंदणी कार्यालयात गोंधळ

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – राज्य शासनाला हजारो कोटींचा निधी मिळवून देणाऱ्या दस्त नोंदणीबाबत सरकार आणि प्रशासन उदासीन आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. सातत्याने कोणत्या ना कोणत्या अडचणीमुळे दस्त नोंदणीचे काम अडखळते. परंतु या समस्या दूर करण्यात सरकार आणि प्रशासनाला कोणताही रस नसल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी देखील वीज पुरवठा खंडित झाल्याचे कारण देत सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली १४ मध्ये दस्त नोंदणी ठप्प झाली.
लांबून आलेल्या नागरिकांना आणि वकिलांना परत पाठविण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे कोट्यवधीचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या या कार्यालयाकडे वीज पुरवठा खंडित झाल्यावर काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा पाॅवर बॅकअपही नाही.दस्त नोंदणी करण्यासाठी गेलेल्या अॅड. नितीन तिडके यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले की, वीज पुरवठा खंडित झाल्याचे कारण देत दस्त नोंदणी थांबविण्यात आली. लांबून लोक सुट्टी घेऊन येत असतात. त्यांना दिवसभर थांबूनही काम होत नाही.
येथील अधिकारी देखील पर्यायी व्यवस्था करण्याएवजी उद्धटपणे उत्तरे देतात. आमच्या वरिष्ठांना जाऊन विचारा, अशी उत्तरे सरकारच्या तिजोरीत मोठा महसूल जमा करणाऱ्या नागरिकांना दिली जात आहेत.येथील अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की गुरुवार असल्यामुळे सकाळीच वीज पुरवठा खंडित झाला होता. बॅटरीचा पाॅवर बॅकअप एक-दोन तासाचाच असल्याने काहीच दस्त होऊ शकले. महावितरणकडून दुपारी चार वाजता वीज पुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले होते. परंतु चार वाजून गेले तरी वीज पुरवठा पूर्ववत झाला नव्हता.





