Pimpri News : अंगणवाडीला ५० वर्षे पूर्ण, पण मानधनाचा अन्याय कधी संपेल?- डॉ. आढावांचा ठाम आग्रह

प्रभात वृत्तसेवा
चिंचवड – देशाच्या मानवी विकासाची पायाभरणी करणाऱ्या अंगणवाडीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र अजूनही सेविका व मदतनीस मानधनावरच काम करत आहेत. हा अन्याय असून त्यांना न्याय द्यावा, असा ठाम आग्रह ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केला.चिंचवड येथील रोटरी क्लब सभागृहात अंगणवाडी कर्मचारी सभा व एकात्मिक बाल विकास सेवा योजना पिंपरी पूर्व यांच्या वतीने ५१व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम नुकताच झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विभागाचे महिला व बाल विकास उपायुक्त संजय माने होते.
यावेळी नितीन पवार, सुरेश टेळे, आनंद संपत, गोरख मेंगडे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. आढाव यांनी अंगणवाडी ताईंचे समाजातील योगदान अधोरेखित करत “त्या देशाच्या मानवी विकासाच्या दूत आहेत,” असे गौरवोद्गार काढले.कार्यक्रमात ज्येष्ठ सेविका लता वाळके, मीनाक्षी शिंदेकर, सुनिता कांडगे, मोहिनी सोनपाटकी, शशिकला पंडित आदींचा सन्मान करण्यात आला. तसेच एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय व जतन फाउंडेशनतर्फे ३०० सेविकांची मोफत नेत्रतपासणी व चष्मे वाटप करण्यात आले.





