PMC Election : महिला सक्षमीकरणावर भर देणार; अनिल टिंगरेंनी दिले आश्वासन

पुणे : महापालिकेच्या माध्यमातून महिलांसाठी स्वयंरोजगार, बचतगट, महिलांची सुरक्षा तसेच महिलांच्या अर्थिक सक्षमीकरणासाठी शासनाच्या वेगवेगळया योजनांची अंमलबजावणी करण्यास विशेष प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती प्रभाग १ मधील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिल ( बाॅबी) वसंतराव टिंगरे यांनी दिली.
टिंगरे यांच्या प्राचारार्थ प्रभागात महिला बचतगटांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टिंगरे यांनी महिलांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेत मोठा भाऊ म्हणून ते सोडविण्यास सर्वोत्परी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी अश्विनी भंडारे, संगीता दांगट, वंदना खांदवे या महिला उमेदवारही सहभागी होत्या. टिंगरे म्हणाले की, आज प्रत्येक क्षेत्रात महिला आग्रेसर आहेत.
प्रभागातील महापालिकेच्या शाळांमधील मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि स्वसंरक्षणाचे धडे देण्यासह, वेगवेगळया खेळांचे प्रशिक्षण मिळावे यासाठी आपले प्राधान्य आहे. प्रभागातील महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक भागात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. या शिवाय गृहीणींसाठी बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण, महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत तसेच प्रशिक्षण, प्रभागात महापालिकेच्या रूग्णालयात चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा यासाठी आपले पहिले प्राधान्य राहणार असल्याचे स्पष्ट केले. या वेळी महिलांनी टिंगरे यांचे औक्षण करत त्यांचे जोरदार स्वागत केले.





