Pimpri : लाच स्वीकारल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी अटकेत

वडगाव मावळ : एका व्यक्तीच्या आजाराबद्दल शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याने पाच हजारांची लाच घेतली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तळेगाव दाभाडे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यास रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.१८) दुपारी करण्यात आली. उन्मेश सोपान गुट्टे (वय ५४) असे अटक केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय व्यक्तीने एसीबी कडे तक्रार केली होती.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीचा मित्र याच्या वडिलांकडून कुलमुखत्यारपत्र तयार करून घ्यायचे आहे. त्या कामासाठी मित्राने तक्रारदार यांना अधिकार पत्र दिले आहे. मित्राच्या वतीने तक्रारदार यांनी रजिस्टर ऑफिसला अर्ज दिला. कुलमुखत्यारपत्र करण्यासाठी तक्रारदाराचा मित्र आणि त्यांचे वडील दोघेही हजर राहणे आवश्यक होते. मात्र मित्राच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्याने ते बेडवर झोपून आहेत. त्यांना कोणतीही हालचाल करता येत नाही. त्यामुळे कुलमुखत्यारपत्र बनविण्याच्या प्रक्रियेकरिता रजिस्टर कार्यालयात त्यांना हजर राहता येत नाही, याबाबत रजिस्टर कार्यालयास सांगण्यात आले.
रजिस्टर कार्यालयातून मित्राच्या वडिलांचे शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले. त्याबाबत तक्रारदार यांनी तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी उन्मेश गुट्टे यांच्याकडे प्रमाणपत्र मागितले. हे प्रमाणपत्र देण्यासाठी गुट्टे यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली असता एसीबीने मंगळवारी सापळा लावला. ५ हजार रुपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी गुट्टे यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.





