पिंपरी – पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा काबिज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्थानिक पदाधिकार्यांना विविध जबाबदाऱ्या दिल्या आहेत. शहर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष पदी शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या दृष्टीने जिल्हा समन्वय व नियोजन करण्यासाठी समन्वयक पदी पिंपरी चिंचवड शहरासाठी माजी आमदार विलास लांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही नियुक्तींबाबत माहिती देताना पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले की, पक्षाचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी व आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. ते यशस्वी प्रयत्न करतील, असा विश्वास आहे.