Pimpri : बालनाट्य स्पर्धेत जैन इंग्लिश स्कूल व आदर्श विद्या मंदिर प्रथम

तळेगाव दाभाडे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे मावळ आयोजित कै.पै.मोहन महादेव काकडे स्मरणार्थ, कै.थोर साहित्यिक गो.नी. दांडेकर करंडक आंतरशालेय बालनाट्य एकांकिका स्पर्धा नुकत्याच तळेगाव येथील श्रीरंग कलानिकेतनच्या रंगमंचावर संपन्न झाल्या.
मावळ तालुक्यातून प्राथमिक गटात ११ शाळा व माध्यमिक गटात ९ शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्राथमिक गटातून जैन इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे यांच्या “लांबच लांब शेपूट” या एकांकिकेला प्रथम क्रमांक मिळाला, तर माध्यमिक विभागात आदर्श विद्यामंदिर या प्रशालेच्या “घे भरारी” या नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेला शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सुप्रसिद्ध विनोदी मराठी अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, कार्याध्यक्ष गणेश काकडे, पंडित सुरेश साकळवकर, विलास काळोखे, नितीन शहा, विश्वास देशपांडे, संजय वाडेकर, बाळासाहेब गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आपल्या अंगी असलेले कलागुण व छंद जोपासून खूप कष्ट करून मोठे व्हावे असे प्रतिपादन विनोदी अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके यांनी केले. तर समाज उपयोगी उपक्रमास व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सदैव तत्पर राहू असे प्रतिपादन नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष गणेश काकडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी केले तर सूत्रसंचालन स्पर्धाप्रमुख भगवान शिंदे यांनी केले, आभार प्रमुख कार्यवाह विश्वास देशपांडे यांनी मानले.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
प्राथमिक शाळा गटात प्रथम क्रमांक (जैन इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे), द्वितीय क्रमांक (पैसाफंड प्राथमिक शाळा – यात चूक कुणाची), तृतीय क्रमांक (आदर्श प्राथमिक विद्या मंदिर – जादूचा शंख), माध्यमिक विभाग गटात प्रथम क्रमांक (आदर्श विद्यामंदिर), द्वितीय क्रमांक (जैन इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे – चिऊ काऊ), तृतीय क्रमांक (सह्याद्री इंग्लिश स्कूल – सिंहगडाला जेव्हा जाग येते).
भव्य फिरता करंडक, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, रोख रक्कम देऊन नाट्य परिषदेने शाळांना गौरविले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या या स्तूत्य उपक्रमाचे मावळ तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे.





