Pimpri : शहरात काँग्रेसला साोन्याचे दिवस आणण्याच्या सूचना

पिंपरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशावरून निरिक्षक प्रफुल्ल गुडदे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी, चिंचवड शहर काँग्रेसच्या पदाधिकार्यांचा मेळावा पिंपरीत पार पडला. पक्षाच्या स्थानिक नेतेमंडळींनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आवश्यक कामाबाबत आपले विचार व्यक्त केले.
यावेळी उपस्थित पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना निरीक्षक प्रफुल्ल गडदे पाटील म्हणाले की, सर्वांनी मिळून पक्षाला उभारी देण्याचे काम केले तर महापालिकेमध्ये चांगल्या संख्येने सदस्य निवडून येतील. पक्ष संघटना मजबूत करण्याकरिता दरमहा बैठका होणार असून त्याचा अहवाल राष्ट्रीय स्तरापर्यंत जाणार आहे. त्यामुळे प्रामाणिक काम करणार्या कार्यकर्त्यांना भविष्यात चांगली संधी आहे. शहर काँग्रेसची संघटना यापुढे आणखी मजबूत करण्यासाठी व शहर काँग्रेसला पुन्हा सोन्याचे दिवस कसे आणता येईल याबद्दल त्यांनी सूचना केल्या.
पक्ष संघटन ब्लॉक स्तरावर भक्कम करून महापालिकेत सदस्य निवडून आणण्यासाठी विशेष मोहीम राबवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचा मतदार असून त्यांच्यापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याला पोहोचण्यासाठी कार्यक्रम दिला जाईल, त्यावर प्रदेश व राष्ट्रीय स्तरावरून विशेष लक्ष असणार आहे, यापुढे जिल्हाध्यक्षांना सर्व अधिकार राहणार असून त्यांच्या शिफारसीनुसारच नियुक्त्या तसेच तिकीट वाटप शिफारस होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी पदाधिकार्यांनी यापुढे पक्षशिस्त लक्षात घेऊन कुठेही पक्ष संघटनेच्या शिस्तीचा भंग होणार नाही याची काळजी घेऊनच कार्य करावे.
या कार्यक्रमात ज्येष्ठ पदाधिकारी तानाजी काटे, भाऊसाहेब मुगुटमल, राजाराम भोंडवे, लक्ष्मण रुपनर, अभिमन्यु दहितुले, भास्कर नारखेडे, रवि खन्ना, शौकत अली यांचा पुणेरी पगडी, शाल, कृतज्ञता पुरस्कार सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
या बैठकीला गौतम आरकडे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, मयूर जयस्वाल, माजी नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष, शहर पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवक व एन.एस.यु.आय. सेवादल, इंटक, सर्व सेल व विभाग यांचे पदाधिकारी यांच्या सोबत आढावा बैठक घेण्याकरिता उपस्थित झाले.





